आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत साक्षी जडयाळने मिळवले यश

प्रथमच ४२.१९५ किमी अंतराच्या शर्यतीत धावली अन जिंकली!
चिपळूण तालुक्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झळकावले नाव!

चिपळूण :संतोष सावर्डेकर – पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी संजय जड्याळ या धावपट्टूने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळवले आहे. विशेष म्हणजे साक्षी प्रथमच फुल मॅरेथॉनमध्ये (४२.१९५ कि. मी.) सहभागी झाली आणि जिंकली ही! तिच्या या यशाने चिपळूण तालुक्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव झळकले आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एरवी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हटले, की आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, महिलांच्या मॅरेथॉनमध्ये या वर्चस्वाला रविवारी धक्का बसला. महाराष्ट्राच्याच चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी संजय जड्याळने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळवले आहे. सणस क्रीडांगणापासून रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. गेल्या वर्षी साक्षीने पुणे मॅरेथॉनमधील अर्धमॅरेथॉन जिंकली होती. या वेळी ती जिद्दीने ४२.१९५ किमी अंतराच्या शर्यतीत सहभागी झाली.

यासाठी तिने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून साताऱ्यात कसून सराव केला होता. या मेहनतीचे रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी चीज झाले. जिंकण्याच्या जिद्दीनेच साक्षी मॅरेथॉनसाठी आली होती. मात्र, आफ्रिकन धावपटूंचा सराव पाहून तिच्या मनात भीतीही होती. अर्थात, काही झाले तरी बाजी मारायचीच, याची खूणगाठच जणू तिने मनात बांधली होती. त्यामुळे शर्यंत सुरू झाल्यावर ती आघाडीच्या जथ्यातच होती. मात्र, जसजशी शर्यत अखेरच्या टप्प्याकडे जाऊ लागली, तसा जथ्याही विखुरला. अखेरच्या टप्प्यात साक्षी आणि इथिओपियाची एडाओ मेसेरे तुलू यांच्यात चुरस होती. त्यापाठोपाठ, इथिओपियाचीच वारे बोंटू डेमिसे होती. अखेरची तीन किलोमीटर राहिले असताना साक्षीने गिअर बदलले. तिने पूर्ण जोर लावला आणि पाहता पाहता या शर्यतीत बाजीही मारली. साक्षीने २ तास ३९ मिनिटे ‘व ३७ सेकंद अशी वेळ नोंदवली.

विशेष म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये गेल्या काही वर्षांत महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमधील भारतीय धावपटूने नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ ठरली. इथिओपियाची एडाओ मेसेरेट तुलू २ तास ४० मिनिटे व ५६ सेकंद वेळ नोंदवून दुसऱ्या, तर बोंटू डेमिसे २ तास ५० मि. ४६ सेकंद वेळेसह तिसऱ्या स्थानी राहिली. विशेष म्हणजे साक्षी प्रथमच फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली आणि तिने दैदिप्यमान यश मिळवले.

चौकट

साक्षी जिद्द हरली नाही!

सुरुवातीला साक्षीला शाळेतील क्रीडा शिक्षकांनी धावण्यासाठी प्रोत्साहन दिले. लहानपणी मिनी मॅरेथॉन मध्ये ती सहभागी झाली होती. तिथे ती जिंकली आणि तिच्या खेळातील प्रवासाला प्रारंभ झाला. २१ वर्षीय साक्षी मुळची चिपळूण तालुक्यातील कुडप गावची. तिने सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम शाळेत शिक्षण घेतले आहे. अनेक अडचणीना तोंड देत खेळात विषेश प्रगती केली. या धावपळीत एकदा हाताचे हाड मोडले. प्लेट बसवल्या. पुन्हा काढल्या. तिच्या आईने ही तिच्यासाठी खूप मेहनत घेतली. परंतु, साक्षी डगमगली नाही. अनेक शालेय स्पर्धा, फेडरेशन स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा तिने जिंकल्या. डेरवण येथे तिने क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांच्या सहकार्याने नवरत्न ॲकॅडमीमध्ये अविनाश पवार ॲथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू आणि कोच यांचेकडे धडे घेतले. क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे यांचे देखील तिला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. साताऱ्यात समाधान पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षापासून सराव करत आहे. ती उल्हासनगरच्या मुंबई -एसएससीटी कॉलेजमध्ये बीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.

चौकट

आनंद द्विगुणित- साक्षी जडयाळ

यशानंतर साक्षी म्हणाली की, परदेशी धावपटूंना पाहिल्यानंतर थोडी भीती वाटली होती. मात्र, यश मिळवणेची जिद्द बाळगली होती. त्यातच वेळही चांगली दिली. मी २ तास ५० मिनिटांची अपेक्षा ठेवली होती. मात्र, त्याहून चांगली वेळ नोंदली गेल्याने आनंद द्विगुणित झाला आहे, अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे.