आ. शेखर निकम यांनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट
एमडींना तातडीने कार्यवाहीचे आदेश
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि शिवाजीनगर बसस्थानकाच्या रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या दोन्ही बसस्थानकांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही निविदा प्रक्रिया रखडल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली नाही. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन दोन्ही बसस्थानकांच्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक हे कोकणातील महत्त्वाचे आणि वर्दळीचे बसस्थानक असून दररोज हजारो प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करतात. या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी दोन टप्प्यांत कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अंदाजित २.८७ कोटी रुपये निधीतून रस्ते, बाह्य शेड व इतर संरचनात्मक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील अंदाजित २.३० कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणारी फरशी (टाईल्स), रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण तसेच इतर आवश्यक बांधकामांची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रशासकीय मान्यता मिळूनही निविदा प्रक्रिया रखडल्याने प्रत्यक्ष कामाला विलंब होत आहे.
दुसरीकडे, चिपळूणमधील शिवाजीनगर बसस्थानकाची अवस्थाही चिंताजनक आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेसची ये-जा असलेल्या या बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था, मोकाट जनावरांचा वावर, प्रवाशांसाठी अपुरी आसनव्यवस्था, अस्वच्छ बाकडे, पिण्याच्या पाण्याची गैरसोय तसेच झाडे-झुडपांची वाढ यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शिवाजीनगर बसस्थानकाच्या विकासासाठी आ. शेखर निकम यांनी यापूर्वीच ३.५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. या कामाला १३ जानेवारी २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळूनही निविदा प्रक्रिया पुढे न गेल्याने काम रखडले आहे. या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांकडे परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधताना आमदार निकम यांनी निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याची मागणी केली. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.











