अनुग्रह विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य
खेड (प्रतिनिधी): — लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने अनुग्रह विशेष शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक भावनिक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. ही मुलेदेखील आपल्या समाजाची आणि देशाची महत्त्वाची घटक आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असावे आणि त्यांनाही आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या भावनेतून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने हा उपक्रम राबविला.
काही दिवसांपूर्वी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने अनुग्रह विशेष शाळेतील विद्यार्थ्यांना खेड रेल्वे स्थानकाची सफर घडवली होती. यावेळी स्थानकावर आलेली ट्रेन पाहून विद्यार्थ्यांनी ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या विशेष मुलांची ही इच्छा लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने त्यांना खेड ते चिपळूण असा रेल्वे प्रवास घडवून आणण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बुधवारी खेड रेल्वे स्थानकातून दिवा–मालगाव पॅसेंजर ट्रेनद्वारे या विद्यार्थ्यांना रेल्वेची अविस्मरणीय सफर घडविण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच रेल्वे प्रवास असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी ट्रेनचा अनुभव मनापासून घेतला आणि हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खेड रेल्वे स्थानकातील कर्मचारी तसेच आरपीएफ यांनी विशेष सहकार्य केले. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे विशेष मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो तसेच समाजात संवेदनशीलता, समता आणि माणुसकीचा संदेश पोहोचतो, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.











