चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय व प्रांत कार्यालय यांच्यामधील नाल्यावर सुरू असलेल्या मोरीच्या चुकीच्या बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय महामार्ग विभागाने गंभीर दखल घेतली आहे. तक्रारीनंतर सदर ठिकाणी टाकण्यात आलेले चुकीचे व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य पाईप काढून टाकून, नियोजित आराखड्यानुसार नव्याने पाईप बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
यापूर्वी सदर मोरीचे बांधकाम कोणतीही योग्य लेव्हल न ठेवता करण्यात येत होते. तसेच तुटके व जुने सिमेंट पाईप वापरण्यात येत असल्याचे, पाईप टाकण्यापूर्वी आवश्यक पीसीसी न केल्याचे आणि पाईपभोवती वापरण्यात येणारा भराव निकृष्ट दर्जाचा विदर्शनास आले होते यामुळे भविष्यात पाणी अडून परिसरात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. भागवत यांनी ही बाब राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगर परिषद व महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. कार्यकारी अभियंता अनामिका जाधव व उप अभियंता नजीम मुल्ला यांच्या सूचनेनुसार सदर काम तातडीने थांबवून चुकीचे पाईप काढण्यात आले असून आता मोरीचे काम तांत्रिक मानकांनुसार व नियोजित आराखड्याप्रमाणे केले जात आहे. प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातील संभाव्य पाणी तुंबण्याचा धोका टळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











