राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या १९ वर्षांखालील मुलींनी पटकावले उपविजेतेपद

चिपळूण (प्रतिनिधी) : नंदुरबार येथे दि. ५ ते ७ डिसेंबरदरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारून उपविजेतेपद पटकावले. डॉ. योगिता खाडे आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या रत्नागिरीच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि संघभावनेने खेळ सादर केला.
या संघाचे नेतृत्व कर्णधार स्वरा सचिन संसारे (गुहागर) यांनी केले, तर उपकर्णधार म्हणून सानिया महाकाळ (रत्नागिरी) यांनी जबाबदारी सांभाळली. संघात गार्गीय अनंत चव्हाण (गुहागर), रिया खातु (गुहागर), प्रज्ञा प्रदीप मोहिते (चिपळूण)सेजल कालेकर (राजापूर), मनाली निंबरे (रत्नागिरी), सलोनी धावडे (राजापूर), सानिका अलीम (रत्नागिरी), यशस्वी धावडे (राजापूर), तेजल कुवळेकर (राजापूर) आणि हर्षाली पांचाळ (राजापूर) या खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. संघ व्यवस्थापनाची धुरा टीम मॅनेजर स्वप्निल धामणस्कर आणि युवराज मोरे यांनी समर्थपणे सांभाळली. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राचे सचिव मोहम्मद बाबर, जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, उपाध्यक्ष मंगेश माटे, ॲड. संकेत साळवी, ओमकार संसारे, संकेत शिंदे, शशिकांत उदेक आणि हुजैफा ठाकूर यांनी संघाचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.