राजापूरात ९ ते ११ जानेवारी दरम्यान किर्तन महोत्सवाचे आयोजन

नामवंत किर्तनकारांचा सहभाग

राजापूर (वार्ताहर): राजापूरातील किर्तन प्रेमींकडून सलग दुसऱ्या वर्षी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात शुकवार दि.९ ते रविवार दि.११ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत सायंकाळी ७ ते ९ वा. या वेळेत पाटील मळा, यशोदिन सृष्टी येथे हा किर्तन महोत्सव होणार आहे. तशी माहिती मंगळवारी किर्तन प्रेमींकडून आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महाराष्ट्रात किर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. बरेचदा आपण आपल्या जवळच्या देवळात रात्री च्या वेळी टाळ-मृदूंगाच्या गजरात रात्र जागवलेली अनुभवली असेलच. भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. संत साहित्य, संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्राrय-सुगम संगीत गायन, विषय विवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा, कलेचा आविष्कार म्हणजे किर्तन. सध्या किर्तनात वारकरी किर्तन संयुक्त किर्तन, जुगलबंदी किर्तन, राष्ट्रीय किर्तन, वैज्ञानिक किर्तन असे प्रकार सादर केले जातात.
राजापूरात मागिल वर्षापासून किर्तन प्रेमी मंडळी तीन दिवसांचा किर्तन महोत्सव आयोजित करत असून यंदा हे दुसरे वर्ष आहे. गावागावातील मंदिरात उत्सव प्रसंगी किर्तने होत असतांत पण काही वेळा सर्वांनाच त्याचा अनुभव घेता येत नाही तोच भक्तीपूर्ण आनंद घेता यावा यासाठीच याचे आयोजन किर्तन प्रेमी यांनी केले आहे. हिंदू संस्कृतीवर होत असलेले पाशात्त संस्कृतीचे अंधानुकरण, तामसी वृतीत होत असलेली वाढ त्याच बरोबर वाढत चाललेली नकारात्मकता तसेच विज्ञानाची सांगड घालत संत मंडळीनी व पूर्वजांनी केलेली सण व उत्सवांची मांडणी सण व उत्सवांवर होणारे वैचारीक आक्रमण हे आपण पहात आहोत. असे असताना समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम हे किर्तन असल्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर महोत्सव शुक्रवार दि.९ जानेवारी ते रविवार दि.११ जानेवारी असा तीन दिवस होणार आहे. या महोत्सवात दि. ९ रोजी कुडाळ येथील किर्तनकार प्रशांत धोंड, दि.१० रोजी रत्नागिरी येथील किर्तनकार कैलास खरे, दि.११ रोजी पुणे येथील किर्तनकार सौ.मानसीताई बडवे यांची किर्तने होणार आहेत. किर्तनानंतर सर्वांना प्रसादाचीही सोय असणार आहे. तरी सर्वांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, तसा किर्तन महोत्सवासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन किर्तन प्रेमींकडून करण्यात आले आहे. या किर्तन महोत्सवासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्यांनी मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला राजापूर तालुका ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण करंबेळकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महेश सप्रे, किर्तनप्रेमी प्रकाश पाध्ये, अनंत रानडे, राजू रानडे, प्रसन्न देवस्थळी आदी उपस्थित होते.