चिपळूण (प्रतिनिधी) : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात धर्माध, मनुवादी, जातीयवादी मानसिकतेच्या राकेश किशोर नावाच्या वकिलाकडून भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती यांच्या वतीने या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. तसेच भ्याड हल्ला करणाऱ्या वकील राकेश किशार यांच्यावर अत्यंत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्याची वकिलीची सनद कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात धर्माध, मनुवादी, जातीयवादी मानसिकतेच्या राकेश किशोर नावाच्या वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर भर न्यायालयातच अशा प्रकारे बुट फेक करणे म्हणजे हा केवळ त्या पदाचा, त्या व्यक्तीचा अपमान नसून सार्वभौम भारत देशाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचा घोर अपमान आहे. त्या वकिलाने ही कृती करताना आपल्या वैचारिक वारशाचाही उलगडा केलेला आहे. ही कृती करताना त्याने “सनातन धर्म का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन सरन्यायाधीशांवर बूट फेक करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी या देशातील दलित समाजातील, अंबिडकरी समूहातील एक उच्चविद्याविभूषित व्यक्ती आरूढ होणे, हे या देशातील मनुवादी, जातीयवादी, धर्माध विचारसरणीच्या विकृत लोकांना मान्य नाही. अशा विकृत लोकांचे प्रतिनिधित्व राकेश किशोर यांच्या रूपाने झालेले आहे. शिवाय सरन्यायाधीश पदावर नियुक्त झाल्यापासून भूषण गवई यांनी न्यायनिवाडे करताना जी नि:ष्पक्ष भूमिका घेतली आहे. संविधानिक मूल्यांना व निष्पक्ष न्यायव्यवस्थेला धरून निवाडे तथा निरीक्षणे नोंदवित आहेत, ती या धर्माध व मनुवादी व्यवस्थेला रुचत नसल्यामुळे त्यांच्यावर असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे भ्याड हल्ला करणाऱ्या वकील राकेश किशार यांच्यावर अत्यंत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्याची वकिलीची सनद कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, अशा विकृत मानसिकतेला विचारधारेला पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती यांच्या वतीने करण्यात आली. तशा आशयाचे निवेदनही प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना देण्यात आले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, शिक्षण कमिटी अध्यक्ष विलास सकपाळ, उपाध्यक्ष दिलीप मोहिते, सिद्धार्थ जाधव, विकास गमरे, उल्हास कदम, सुधाकर पवार, प्रशांत मोहिते, तुषार गमरे, संजय जाधव, रमेश सकपाळ, भाऊ पवार, प्रशांत कांबळे, मंगेश जाधव, तुकाराम सकपाळ, गणपत सावंत, जगदीश कांबळे, दिवाकर जाधव, प्रभाकर सकपाळ, अशोक पवार, उत्तम पवार, सिद्धार्थ पवार, विलास पवार, अमोल कदम, सचिन गमरे, राजेंद्र कदम, मेजर सुभेदार दत्ताराम मोहिते आदी उपस्थित होते.












