भारजेच्या पुराने चिंचघर मांदिवली पूल पाण्यात रस्ता पाण्याखाली; मार्ग बंद; परिसरातील शेती पाण्याखाली

किनारी भागातील गावांचा संपर्क तुटला

मंडणगड | प्रतिनिधी : तालुक्यात सतत चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरु असल्याने भारजा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. चिंचघर मांदिवली पुलावरून 19 जुलै 2023 रोजी यंदाच्यापावसात पहिल्यांदा पाणी गेले. पूल, पुलाला जोडणारा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला असून दिसेनासा झाला आहे. वाहतूक बंद झाली आहे. परिसरातील शेकडों एकर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. परिसराला समुद्राचे रूप आले आहे. मंडणगड तालुक्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नद्या, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. संततधार पावसामुळे मंडणगड दापोली मार्गावरील चिंचघर व मंदिवलीला जोडणाऱ्या पुलावरून भारजा नदीचे पाणी वाहू लागले. संध्याकाळी हा रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहुतक बंद झाली. तसेच या पुलाला दोन्ही बाजूला रेलिंग नसल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडील गाड्या चिंचघर व मांदीवली या गावात रात्री थांबवण्यात आल्या. पाण्याचा प्रचंड प्रवाहामुळे पाणी नदी पात्रापासून एक किमी लांब चिंचघर गावाच्या पायथ्याशी आले. त्यामुळे येथील रस्ताही पाण्याखाली गेला. संपर्क तुटल्याने परिसरातील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल झाले. चिंचघर – मांदिवली दरम्यान असणारा हा पूल तीस वर्षांपूर्वीचा असून त्याला दोन्ही बाजूला रेलिंग नसल्याने धोकादायक बनला आहे. भारजा नदीच्या पाणी पातळीचा विचार करता त्याची उंची वाढविणे अत्यावश्यक आहे. पुलावरून पाणी गेल्याने मंडणगड दापोली तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून नागरिकांचे हाल झाले. नदीचे पाणी शेतीत घुसले आहे.

पुलाची उंची वाढवावी अशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. या आमसभेत हा विषय मांडून आमदारांचे लक्ष वेधले होते, यावर या पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करून दिशादर्शक फलक व रेलिंग बाबत काम करण्याचे सांगण्यात आले. मात्र कृती करण्यात आली नाही. राज्यात सर्वत्र गाळ काढला जात असताना भारजा नदीतील हा गाळ काढणे अत्यंत आवश्यक असतानाही याही मागणीकडे कानाडोळा करण्यात आला. परिणामी पुराचे पाणी खलाटीत घुसले असून शेकडों एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरवर्षी अशी परिस्थिती होत असल्याने शेतकरी शेती सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. याला शासन, प्रशासन जबाबदार आहेत. वसीम चिपोळकर, ग्रामस्थ व ग्राम. सदस्य चिंचघर
सततच्या पावसामुळे 19 जुलै 2023 रोजी तालुक्यातील तुळशी घाट, उमरोली बाणकोट रस्ता, लाटवण रस्ता, केळवत घाट या ठिकाणी रात्रीच्या वेळी दरडी कोसळल्या मात्र महसुल विभाग व सार्वजनीक बांधकाम खाते यानी दरड वेळेवर साफ करण्याची तत्परता दाखवत वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही याची पुरेपुरे काळजी घेतली खेड शहरात पाणी भरल्याने मंडणगड खेड एस.टी. प्रवाशी फेऱ्या बंद होत्या, 20 जुलै 2023 रोजी तालुक्यातील 177 मिलीमीटर इतका पावूस झाला मान्सुनते हंगामात 1629 मिलीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून गतवर्षीच्या सरासरी पेक्षा अधिक पावसाचीही नोंद झाली आहे. हवामानातील बदलामुळे परिस्थिती पुर्ववत होईपर्यंत म्हाप्रळ आंबेत फेरीबोट सेवा बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे मुंबई व पुणे मार्गावरील एस.टी. गाड्या या मार्गावरुन न जाता पर्यायी मार्गाने प्रवास करीत आहेत. दरम्यान तालुक्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असली तरी कुठल्याही धरणातून पाणी सोडण्यात आलेले नसल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. तिडे येथील मोरीवरुन पाणी गेले आहे. सतत धार पावूस पडला तरी तालुक्यात संपत्ती व जीवीत हानी झालेली नाही.