लांजा तहसील कार्यालय येथे होणार मतमोजणी,
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत कुंभार यांची माहिती
लांजा ( प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीचा रविवारी २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असून सकाळी दहा वाजल्यापासून लांजा तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी साडेअकरा पर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा लांजा न.पं.मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लांजा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते . या निवडणुकीचा निकाल रविवारी २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज लांजा तहसील कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना नगरपंचायत मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत कुंभार यांनी सांगितले की, रविवारी सकाळी २१ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रारंभ होणार आहे. ही मतमोजणी लांजा तहसील कार्यालय या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएम मशीन तहसील कार्यालय सभागृह येथे शासकीय वाहनातून आणि जीपीएस लावून आणण्यात येणार आहेत. त्यानंतर दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होईल
मतमोजणी ही तीन राउंड मध्ये होणार आहे यासाठी पहिल्या राउंडसाठी सात, दुसऱ्या राउंडसाठी सात आणि तिसऱ्या राऊंडसाठी पाच टेबल लावण्यात येणार आहेत. त्यानुसार १९ केंद्रांवरील मतमोजणीला प्रारंभ होऊन सकाळी ११.३० पर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल.
या मतमोजणीसाठी संबंधित उमेदवार किंवा त्यांची प्रतिनिधी यांनी सकाळी साडेनऊ वाजता लांजा तहसील कार्यालय या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत कुंभार यांनी केले आहे.











