IIT बॉम्बेमध्ये डॉ. प्रमोद चौधरी यांच्या सन्मानार्थ अत्याधुनिक डायनिंग हॉलचे उद्घाटन

वसतिगृह क्रमांक 4 मध्ये नव्या जेवणाच्या सुविधेचा शुभारंभ

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक 4 मध्ये नव्याने पुनर्निर्मित, अत्याधुनिक आणि 800 हून अधिक आसनक्षमता असलेल्या भव्य डायनिंग हॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा डायनिंग हॉल प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आणि IIT बॉम्बेचे 1971 बॅचचे माजी विद्यार्थी डॉ. प्रमोद चौधरी यांच्या सन्मानार्थ नामांकित करण्यात आला आहे.


पुणे : IIT बॉम्बेच्या पवई कॅम्पसमधील वसतिगृह क्रमांक 4 येथे विद्यार्थ्यांसाठी नव्या पिढीची, आधुनिक जेवणाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 800 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकावेळी सामावून घेऊ शकणारा हा डायनिंग हॉल सध्या IIT बॉम्बेतील सर्वात मोठा आहे.

ही सुविधा IIT बॉम्बेच्या व्यापक परिवर्तनात्मक अजेंडाचा भाग असून, यामध्ये विद्यार्थ्यांचे कल्याण, निवासी जीवनाचा दर्जा आणि समुदाय अनुभव समृद्ध करणे यावर भर देण्यात आला आहे. शिक्षण हे केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि सामायिक अनुभवांमधूनही घडते, या भूमिकेवर ही संकल्पना आधारलेली आहे.

डॉ. प्रमोद चौधरी हे स्वतः वसतिगृह क्रमांक 4 चे माजी रहिवासी असून, त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच IIT बॉम्बेशी आजीवन नाते जपले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून आणि योगदानातून संस्थेच्या ध्येयाला बळकटी देण्याचे त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न या डायनिंग हॉलच्या नामकरणातून अधोरेखित होतात.

उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले,
शिक्षण हे केवळ औपचारिक प्रशिक्षणातून नव्हे, तर सामायिक अनुभवांतून घडते. माझ्या IIT बॉम्बेच्या दिवसांत डायनिंग हॉल हे केवळ जेवणाचे ठिकाण नव्हते, तर विचारांची देवाणघेवाण, मैत्री आणि दृष्टीकोन विस्तारण्याचे केंद्र होते. ही नवी जागा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाला चालना देईल, अशी मला खात्री आहे.”

IIT बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीश केदारे म्हणाले,
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सशक्त निवासी आणि सामुदायिक जागा निर्माण करण्याची IIT बॉम्बेची कटिबद्धता या नव्या डायनिंग हॉलमधून दिसून येते. हे परिवर्तन घडवून आणण्यात माजी विद्यार्थ्यांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. संस्थेशी कायमस्वरूपी संलग्नतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवात मोलाचे योगदान दिल्याबद्दल आम्ही डॉ. प्रमोद चौधरी यांचे आभार मानतो.”

प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचा ठाम विश्वास आहे की शैक्षणिक संस्था राष्ट्रनिर्मितीत मूलभूत भूमिका बजावतात. डॉ. चौधरी यांचे IIT बॉम्बेशी असलेले नाते हे सामाजिक दायित्व, दीर्घकालीन प्रभाव आणि भविष्यातील नेतृत्व घडवणाऱ्या ज्ञान परिसंस्थांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्राजच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे.

प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल :
प्राज ही भारताची अग्रगण्य औद्योगिक बायोटेक कंपनी असून, पर्यावरण, ऊर्जा आणि कृषी-प्रक्रिया क्षेत्रांमध्ये गेल्या चार दशकांपासून कार्यरत आहे. सहा खंडांतील 100 हून अधिक देशांमध्ये 1000 पेक्षा अधिक ग्राहक प्राजशी जोडलेले आहेत. Bio-Mobility® आणि Bio-Prism® हे कंपनीच्या जागतिक जैव-अर्थव्यवस्थेतील योगदानाचे प्रमुख स्तंभ असून, शाश्वत विकास आणि डीकार्बोनायझेशन या दिशेने प्राज सातत्याने वाटचाल करत आहे.