दिव्यांगांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ निर्माण करा : सिताराम गावडे

सावंतवाडीत ‘स्वराज्य दिव्यांग संस्थे’चा कॅलेंडर प्रकाशन व साधन वाटप सोहळा 

सावंतवाडी | प्रतिनिधी :“दिव्यांग व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या एक दिव्यशक्ती दडलेली असते. शरीर अपंग असले तरी त्यांच्यातील आत्मविश्वास आणि ऊर्जा अफाट आहे. आज या समाजाला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही, तर त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची गरज आहे. दिव्यांगांनी स्वतःला कधीही कमी लेखू नये, कारण जो मनाने सक्षम असतो तो जगातील कोणत्याही संकटावर मात करू शकतो,” असे प्रतिपादन सकल हिंदू मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ‘कोकण लाईव्ह’चे संपादक सिताराम गावडे यांनी केले.

येथील काझी सभागृहात स्वराज्य दिव्यांग संस्था, सावंतवाडी तालुका यांच्या वतीने आयोजित नववर्ष कॅलेंडर प्रकाशन आणि दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधनांचे वाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ‘राजे प्रतिष्ठान’चे संतोष तळवणेकर, महेंद्र चव्हाण, कृष्णा पाटील, माडखोल गावचे मानकरी राऊळ, निगडे, सरपंच लक्ष्मण निगुडकर, संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल लातीये व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी संतोष तळवणेकर, कृष्णा सावंत, ॲड. नीता सावंत – कविटकर आणि कृष्णा राऊळ यांनीही आपले विचार व्यक्त केले. दिव्यांग सक्षमीकरण आणि सामाजिक स्वीकृती या विषयावर त्यांनी भर दिला. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता समाजानेही आपले कर्तव्य ओळखून दिव्यांगांना मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

साधन वाटपाने दिव्यांगांना आधार

या कार्यक्रमात गरजू दिव्यांग बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या विविध साधनांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरणही मोठ्या उत्साहात झाले.

कार्यक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील दिव्यांग बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.