..तर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार
राजापूर (प्रतिनिधी): शहरातील छप्पर पट्टी धारकांकडून दैनंदिन कर आकारणीला छप्पर धारकांचा विरोध असून याबाबत नगर परिषद प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे यांनी केली आहे. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेऊन एड. खलिफे यांनी याबाबत चर्चा करून यावर सुवर्णमध्ये काढावा अशी मागणी केली आहे.
याबाबत योग्य निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही एड. खलिफे यांनी सांगितले.
राजापूर नगर परिषद क वर्ग नगर परिषद आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी नगर परिषद प्रशासनानेकडून छप्पर पट्टी धारकांकडून दैनंदिन कर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत छप्पर पट्टी धारकांना न. प. कडून नोटीस बजावण्यात आली आहे. याला आता विरोध होऊ लागला आहे. शहरातील काही छप्पर पट्टी धारकांनी याबाबत एड. खलिफे यांची भेट घेतली व आपली कैफियत मांडली. तर बाबत राजापूर तालुका व्यापारी संघानेही दखल घेत व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
यावर खलिफे यांनी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. अशा प्रकारे अचानकपणे छप्पर पट्टी धारकांनी दैनंदिन कर आकारणी करण्याचा निर्णय अन्यायकारक असून आर्थिक दृष्टया अनेकांना ते परवडणारे नाही, अनेक छप्पर पट्टी धारक हे त्यांच्या खासगी जागेत व्यवसाय करतात तर काही भाडयाच्या जागेत व्यवसाय करतात. पावसाळयात काही छप्पर पट्टी धारकांची दुकाने बंदही असतात. त्यामुळे पुर्वी प्रमाणे सहा महिन्यांची छप्पर पट्टी दर आकारणी योग्य असून यात काहीतरी सुवर्णमध्य काढावा अशी मागणी एड. खलिफे यांनी केली आहे.
याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.










