राजापुरातील दरड प्रवण क्षेत्रातील गावांदील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

धोपेश्वर गावातील ग्रामस्थांचे प्रशासनाकडून गुरूवारी स्थलांतर

राजापूर (प्रतिनिधी): रायगड येथे इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राजापूर तालुक्यातील दरडग्रस्त गावे व वाडयांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरानजीकच्या धोपेश्वर खंडेवाडी, गुरवाडी व नाडणकरवाडी भाग हा अत्यंत धोकादायक व दरड प्रवण क्षेत्रात येत असून या भागातील 30 कुटुंबातील 98 ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरीत व्हावे अशा नोटीसा प्रशासनाने बजावल्या आहेत. तर या दुर्घटनेनंतर व बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्री 12 वाजेपर्यंत या भागात जाऊन तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी स्थानिकांशी चर्चा करून स्थलांतराची विनंती केली. मात्र गुरूवारी रा सर्वग्रामस्थांचे राजापूर शहरातील श्री मंगल कार्यालयात स्थलांतर केले जाणार असल्राची माहीती तहसीलदार सौ. जाधव यांनी पत्रकारांना दिली आहे.

ईर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राजापूर तालुक्यातील दरडग्रस्त गाव व वाडयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. तालुक्यात धोपेश्वर खंडेवाडी, गुरवाडी व नाडणकरवाडी यांसह वडदहसोळ, भू, कोतापूर, रायपाटण गांगणवाडी, तळगाव हा भाग दरड प्रवण क्षेत्रात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही प्रशासनाने या भागातील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र कुणीही स्थलांतरीत झालेले नाही.
शहरानजीकच्या धोपेश्वर खंडेवाडी, गुरवाडी व नाडणकरवाडी या भागात एकूण 30 कुटुंबे असून एकूण 149 इतकी लोकसंख्या आहे. सध्या या ठीकाणी 98 ग्रामस्थांचे वास्तव्य आहे. मात्र यांना स्थलांतराच्या नोटीसा देऊनही हे ग्रामस्थ स्थलांतराला तयार नसल्याचे तहसीदार सौ. जाधव यांनी सांगितले. बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत या भागात बैठक घेऊन चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता प्रशासनकडून या सर्व ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर केले जाणार असून त्यांना शहरातील श्री मंगल कार्यालयात ठेवले जाणार आहे. त्यांच्या जेवण व रहाण्याची सर्व व्यवस्था प्रशासन करणार आहे. तर आजारी असणाऱ्या रूग्णांना रूग्णालयात दाखल करून ठेवले जाणार असल्याचे सौ. जाधव यांनी सांगितले.

या बैठकीप्रसंगी पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांसह स्थानिक ग्रामस्थ व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.
दरड प्रवण गावांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता तालुक्यातील या दरड प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांचे पुर्नवसन करण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. यापुर्वी वडदहसोळ येथे अशाच प्रकारे झालेल्या दुर्घटनेत एका कुटुंबातील आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र त्यांनतर एवढया वर्षात प्रशासनाकडून कोणतेही नियोजन वा स्थलांतराबाबत प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. दरवर्षी पावसाळयात केवळ स्थलांतराच्या नोटीसा बजावून प्रशासन आपले कर्तव्य पार पाडत आहे. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढून् या ग्रामस्थांना भयमुक्त करण्याठी कोणतेच प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे दरवर्षी जसा पावसाळा येतो तशा प्रशासनाच्य नोटीसा येतात असे म्हणून ही मंडळी दुर्लक्ष करत आहेत. मात्र जर का दुदैवाने कोणती दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
फोटो 20 आरजेपी 1