पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक नकाशावर झळकणार : ना. नितेश राणे

पारपोलीत ‘ट्री-हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’चे शानदार उद्घाटन

जिल्ह्याचा पर्यटनातून सर्वांगीण विकास हीच राणे साहेबांची संकल्पना 

तुम्ही प्रस्ताव आणा निधी कमी पडू देणार नाही 

सावंतवाडी | प्रतिनिधी :पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा ही माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची संकल्पना होती. केवळ संकल्पना मांडून न थांबता त्यांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून या ठिकाणी अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले. याच पार्श्वभूमीवर सिंधू रत्न योजनेच्या अंतर्गत सुरू झालेल्या पारपोली येथील ट्री-हाऊस आणि फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होणार असून येथील अर्थकारण बदलेल व अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवेल,” असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
​निसर्गसंपन्न पारपोली येथे वन विभागातर्फे साकारण्यात आलेल्या ‘ट्री-हाऊस’, भव्य स्वागत कमान आणि ‘पारपोली फुलपाखरू महोत्सवा’चा शानदार उद्घाटन सोहळा ना. नितेश राणे यांच्या हस्ते व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित यांना संबोधित करताना पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी वनविभागाच्या माध्यमातून आयोजित या फुलपाखरू महोत्सवाचे विशेष कौतुक केले.

*​निधीची कमतरता भासू देणार नाही: पालकमंत्री*
​आपल्या भाषणात पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी सिंधुरत्न योजनेतून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले गेले आहेत. सद्यस्थितीत ही योजना थांबलेली असली तरीही ती पुन्हा सुरू होण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री व कोकणातील मंत्री या नात्याने विशेष प्रयत्न करणार अशी ग्वाही देतानाच या योजनेतील काही प्रकल्प निधीअभावी थांबले असतील, तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रकल्पांना पुन्हा गती देऊन आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थांनी या परिसराच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना मांडाव्यात, त्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*​गोव्यापेक्षा सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंती मिळावी*
​”आज मोपा विमानतळामुळे पर्यटकांची मोठी संख्या या भागाकडे वळत आहे. मात्र पर्यटक सिंधुदुर्गात एक दिवस तर गोव्यात तीन दिवस थांबतात. जेव्हा पर्यटक तीन दिवस सिंधुदुर्गात आणि एक दिवस गोव्यात घालवेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याचे अर्थकारण बदलेल,” असे नितेश राणे यांनी नमूद केले.

*फुलपाखरू गाव व ट्री हाऊस या प्रकल्पांचा प्रचार व प्रसार व्हावा*
उपवनसंरक्षक मिलिश शर्मा हे सिंधुदुर्गला लाभलेल्या उपवनसंरक्षकांपैकी सर्वोत्तम आहेत. विकास करण्याच्या अनेक संकल्पना तसेच सकारात्मक विचार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे वन विभागाच्या माध्यमातून आता अनेक बदल झालेले दिसतील. फुलपाखरू महोत्सव हा केवळ मर्यादित महोत्सव न राहता पर्यटक या ठिकाणी येण्यासाठी त्याचा प्रचार व प्रसार अधिक व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी
पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी मोपा विमानतळापासून पारपोलीपर्यंत मोठे होर्डिंग्ज लावून या महोत्सवाचा प्रचार व प्रसार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

*​हत्ती प्रश्न व प्राणी संग्रहालयाचा मानस*
​जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या प्रश्नावर बोलताना ना. राणे म्हणाले की, ओमकार हत्ती आता विध्वंस करू लागला आहे. त्यामुळे भविष्यात हत्तींपासून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील. यासाठी ‘वनतारा’ची टीमही दोनवेळा पाहणी करून गेली आहे. तसेच, येत्या ४-५ वर्षांत या भागात भव्य प्राणी संग्रहालय (Zoo) उभारण्यासाठी वनमंत्र्यांना पत्र दिले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

*​जमीन दात्यांचे मानले आभार*
​आजच्या काळात पायवाटेसाठी कुणी जागा देत नाही, अशा स्थितीत या भव्य प्रकल्पासाठी ज्या ग्रामस्थांनी आपली जमीन दिली, त्यांचे ना. नितेश राणे यांनी मनापासून अभिनंदन करीत आभार मानले. येथील स्थानिक सरपंच उपसरपंच तसेच लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी पर्यटक यावेत यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात. अशा प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटक वाढत आहेत मात्र त्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव माझ्याकडे पाठवा ते मंजूर करून देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी राहील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरुवातीला फुलपाखरू महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या भव्य कमानीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फुलपाखरू महोत्सव व त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ट्री हाऊसचे देखील उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पर्यटन मित्र हेमंत ओगले, काका भिसे निखिल कुलकर्णी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ट्री हाऊस ची संकल्पना प्रत्यक्षात राबविणारे प्रमुख परब कृष्णा परब बाळा डांगी राजेश कविटकर तसेच ठेकेदार रुपेंद्र पेड्डी व अरविंद सावंत यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पारपोली सरपंच कृष्णा नाईक, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वैभव बोराटे, उपसरपंच संदेश गुरव, वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून ठेवलेले रोजगार निर्मितीचे ध्येय पूर्ण होणार : आ. दीपक केसरकर*

संस्थान काळात पारपोली ते आंबोली अशी पायवाट होती. आनाही आंबोली धबधबा ते पारपोली अशा येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था वन विभागाने केली आहे. आज परपोली गाव फुल पाखरांचा गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. या गावातील लोकांनी निवास न्याहारी योजना सुरु केली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस येथे वाढत आहे. वनविभागाच्या माध्यमातून पर्यटकांना ने – आण करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. त्याचबरोबर भविष्यात बॅटरी ऑपरेटेड वाहन उपलब्ध करून देणार. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून सिंधुरत्न योजनेतून जे रोजगार निर्मितीचे ध्येय ठेवलं आहे ते पूर्ण होईल. पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन या गावांचा चेहरा मोहरा बदलून जाईल, असा विश्वास सिंधू रत्न योजनेचे माजी अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.