लायनेस्टीक वर्ष २५-२६ चे लायन्स सेवा पुरस्कार जाहीर

उपविभागीय अधिकारी चिपळूण आकाश लिगाडे यांचे आवाहन

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण व गुहागर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करणेत येते कि, ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक २४ डिसेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंद करणेकरीता अर्ज सादर करावेत असेही आवाहन उपविभागीय अधिकारी चिपळूण आकाश लिगाडे यांनी केले आहे.

राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पहाणी करणेबाबत मंडळ अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक २४ डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करावेत. तसेच संबंधित शेतकरी यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दाखल केलेल्या अर्जाची पोहोच घ्यावी.

प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी ही दिनांक २५ डिसेंबर ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये करतील व सदर स्थळपाहणी करण्यापुर्वी समितीमार्फत स्थळपाहणीची दिनांक व वेळ निश्चित करून त्याची पूर्व कल्पना संबंधित शेतकऱ्यास, शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान चार ते पाच शेतकऱ्यांना लेखी स्वरुपात देण्यात येईल. प्रत्यक्ष स्थळ पाहणीच्या दिवशी खरीप हंगाम २०२५मध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची लागवड केली होती त्याची स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामा करुन व शेताच्या बांधाला लागून असलेले इतर शेतकऱ्यांचे जाब जबाब नोंदविण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना नं १२ वर यापुर्वी प्रतिबिंबित झालेली नाही त्या शेतकऱ्यासंदर्भात वरील प्रक्रिया अवलंबविणेत येणार आहे, असे
उपविभागीय अधिकारी चिपळूण आकाश लिगाडे यांनी प्रसिध्द पत्रकातून केले आहे.