चिपळुणात ‘एक दिवस बंधाऱ्यासाठी’ संकल्पनेतून ५२७ बंधारे

१००० बंधारे बांधण्याचा संकल्प- गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील

चिपळूण (वार्ताहर) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत चिपळूण गटात मिशन बंधारे उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत असून गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी ‘एक दिवस बंधाऱ्यासाठी’ ही विशेष मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेत लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून ५०० बंधारे बांधण्याचा संकल्प होता. त्यानूसार विजय १४०, वनराई ४१ व कच्चे ३४६ असे एकूण ५२७ बंधारे उभारण्यात आले. त्यामुळे एक दिवस बंधारे बांधण्यासाठी ही संकल्पना यशस्वी झाली आहे.
या मोहिमेमुळे तालुक्यात आज अखेर विजय २७२, वनराई ७३ व कच्चे ४३४ असे एकूण ७७८ बंधारे पूर्ण झाले असून, पाणी अडवणे व भूजल पातळी वाढवणे या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. यातून लाखो लिटर पाणी जमिनीत जिरण्यास मदत होणार आहे. जिप. गटात प्रभावीपणे जलसंधारणाची कामे अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले असून, मिशन बंधारे अंतर्गत एकूण १००० बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी उमा घारगे -पाटील यांनी दिली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) व प्रकल्प संचालक विजय सिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) सागर पाटील तसेच कृषि विकास अधिकारी अभिजीत गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींमध्ये प्रति ग्रामपंचायत किमान १० बंधारे या उद्दिष्टाने तालुकास्तरावर मोहीम आखण्यात आली होती. गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांसाठी ९ विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली होती. यात पंचायत समितीतील सर्व विभागप्रमुख, कृषि, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, उमेद, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होते. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील उमेद समूहातील महिला, अंगणवाडी सेविका-मदतनीस, जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक-विद्यार्थी, युवक, ग्रामस्थ तसेच एक्सेल इंडस्ट्रीज लोटे यांचे सुद्धा सहकार्य लाभले. विविध ठिकाणी कमी खर्चाच्या नावीन्यपूर्ण पद्धतीने उभारलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणी साठण्यास मदत झाली. सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी-सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत मोहीम यशस्वी केली.