डॉ.तात्यासाहेब नातू महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : शैक्षणिक सत्र २०२५-२६ या वर्षातील मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या २८ वर्षापासून ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या चारित्रिक विकासामध्ये नवनवीन उपक्रम घेण्यात अग्रेसर असणाऱ्या या महाविद्यालयास विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मधुकर चव्हाण, प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांनी मुंबई विद्यापीठाचे आभार मानले आहेत.
तायक्वांदो स्पर्धा ही पुरुष व महिला या गटात विभागली असून दि. ३व ४ जानेवारी २०२६ रोजी पुरुष गट व ४ व ५ जानेवारी रोजी महिला या गटात स्पर्धा होणार आहेत. पुरुष व महिला यांच्या वजनानुसार त्यांचे विभाजन करण्यात आले असून पुरुष गटामध्ये ५४ किलो वजनाखालील, ५४ ते ५८, ५८ ते ६३, ६३ ते ६८, ७४ ते ८०, ८० ते ८७, ८७ किलो पेक्षा जास्त या वजन प्रकारानुसार दिनांक ३ व ४ जानेवारी रोजी स्पर्धा होतील. तसेच महिला गटात ४६ किलो वजनाखालील, ४६ ते ४९, ४९ ते ५३, ५३ ते ५७ किलो, ५७ ते ६२ किलो, ६२ ते ६७ किलो, ६७ ते ७३ किलो, ७३ किलो पेक्षा जास्त वजन असणाऱ्या मुलींच्या स्पर्धा ४ ते ५ जानेवारी रोजी होणार आहेत. पुरुष गटातील मुलांची सकाळी ८ वाजता डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाच्या मैदानामध्ये कागदपत्रांची तपासणी होईल व ११ वाजता स्पर्धा सुरू होईल. तसेच महिला महिला गटातील खेळाडूंची ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता कागदपत्रांची तपासणी होईल व ३ वाजता स्पर्धा सुरू होईल. तसेच ५ जानेवारी रोजी महिला गटातील शिल्लक खेळाडूंची सकाळी ८ वाजता स्पर्धा सुरू होईल. सहभागी खेळाडूंनी आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांचे अधिकृत संमती पत्र, ऑनलाइन पात्रता यादीची दोन प्रती, प्रवेश अर्ज, महाविद्यालयातील विद्यार्थी ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असून संबंधित खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक यांना ओळखपत्राशिवाय स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई विद्यापीठाने दिले आहेत. अधिकृत वजन मोजण्यापूर्वी १ तास आधी वजन काटा खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. एखाद्या वजन गटात किमान ३ वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून ४ पेक्षा कमी खेळाडू असल्यास त्या वजन गटाची स्पर्धा घेण्यात येणार नाही. सर्व सहभागी खेळाडूंनी शासकीय वैद्यकीय तंदुरुस्त प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. कोणत्याही खेळाडूस स्पॉट एन्ट्री दिली जाणार नाही, असेही मुंबई विद्यापीठाने निर्देश दिले आहेत. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव यांनी (७०३८८९३०७१, ८८२८९३३३९३) येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.