ज्येष्ठ नागरिकांचा गौरव आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
येथील तेली समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संताजी जगनाडे महाराज यांची ३२६ वी पुण्यतिथी १७ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परमपूज्य संताजी नगर येथील श्री. दिनकर तेली यांच्या ‘राष्ट्रसंत चंद्रभागा’ निवासस्थानी हा सोहळा संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताजी महाराजांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ मंडळाचे संस्थापक तथा विद्यमान सल्लागार श्री. जयराम (बाळ) आजगांवकर आणि सौ. जयश्री आजगांवकर या दांपत्याच्या हस्ते विधीवत पूजेने झाला. पंडितांच्या सहकार्याने झालेल्या या पूजेनंतर आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला केवळ तेली समाज बांधवच नव्हे, तर इतर समाजातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री. तुकाराम तेली आणि प्रमुख वक्ते म्हणून उद्योगपती तथा माजी जिल्हाध्यक्ष श्री. एकनाथ तेली उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज आणि माता सरस्वतीच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून सत्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन २०२६ च्या नूतन दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. या दिनदर्शिकेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे यावेळी आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील ७५ वर्षांवरील १४ ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह म्हणून संताजी महाराजांची ‘घाणा’ असलेली मूर्ती देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. तुकाराम तेली यांनी योगासनांचे महत्त्व पटवून दिले. योगामुळे आपले जीवन सुखकारक आणि शतायुषी बनते, तसेच मुलांमध्ये बौद्धिक विकास होतो, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते श्री. एकनाथ तेली यांनी ‘राव न करी ते गाव करी’ या म्हणीचा दाखला देत सामाजिक एकतेवर भर दिला. मुलांवर चांगले संस्कार करणे ही काळाची गरज असून, संस्कारक्षम पिढीच भविष्यातील वृद्धाश्रमांची गरज संपवू शकेल, असे विचार त्यांनी मांडले.
अध्यक्षीय भाषणात श्री. श्यामराव निवेलकर यांनी समाजाच्या प्रगतीसाठी पाल्यांना सुसंस्कृत करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, श्री. बाळ आजगावकर यांनी संताजी महाराजांच्या ७६ वर्षांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची जयंती साजरी होत असल्याची माहिती दिली. मंडळाचे सल्लागार श्री. महेश तेली यांनी संघटनेच्या २१ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत सर्वांचे आभार मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष दिनकर तेली, खजिनदार सौ. दीपा तेली, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण तेली, सचिव महादेव आजगांवकर, सदस्य मनोहर तेली, मनोज बांदेकर, हरिश्चंद्र तेली, महेश तळगांवकर, संतोष तेली यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता श्री पाटेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या बहारदार भजनाने झाली.













