मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; स्मार्ट सिटी बनवणार

चिपळूणकरांच्या विश्वासाला उमेश सकपाळ यांचा मानाचा मुजरा

चिपळूण : चिपळूण नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेश धोंडीराम सकपाळ यांनी शहरातील सर्व मतदारांचे व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. गेली अनेक वर्षे आपण केलेल्या सामाजिक कार्याला जनतेने दिलेला हा कौल अत्यंत मोलाचा असून, चिपळूणच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अधिक जोमाने काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

नगराध्यक्षपदाच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सकपाळ म्हणाले की, शहरातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास व प्रेम हीच आपली खरी ताकद आहे. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्या अडचणींमध्ये धावून जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सातत्याने केला असून, त्यालाच आज जनतेची मान्यता मिळाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवडणूक काळात झालेले अपप्रचार, खोटे आरोप व जात-पात आधारित राजकारण असूनही नागरिकांनी विकास व विश्वासाला प्राधान्य दिले, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पुढील काळात रखडलेले विकासप्रकल्प मार्गी लावणे, नागरी सुविधा अधिक सक्षम करणे तसेच चिपळूणचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपणे, हे आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

“आपण दिलेला सन्मान आणि विश्वास कधीही कमी पडू देणार नाही. मी, माझे कुटुंब, माझा पक्ष आणि महायुतीचे सर्व नगरसेवक २४ तास जनतेच्या सेवेत तत्पर राहतील,” असे आश्वासन देत सकपाळ यांनी पुन्हा एकदा चिपळूणकरांचे आभार मानले.

भाजपचे नेते प्रशांत यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह महायुतीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

नगरपालिका आणि चिपळूणवासीयांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय राहावा, समन्वयाच्या माध्यमातून विकासकामे प्रभावीपणे मार्गी लागावीत तसेच शहरातील विविध प्रश्न वेळेत सोडवले जावेत, यासाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली आहे.

चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या विजयानंतर त्याने पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

या प्रस्तावित समन्वय समितीत राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. ही समिती कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक आणि सल्लागार स्वरूपाची भूमिका बजावणार असल्याचे सकपाळ यांनी स्पष्ट केले.

शहरातील नागरी प्रश्न, विकास प्रकल्प, मूलभूत सुविधा तसेच भविष्यातील विकासाचे नियोजन याबाबत नागरिकांचे मत आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रशासनापर्यंत पोहोचावे, हा या समितीचा मुख्य उद्देश असेल. जनतेचा सहभाग आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून ही समन्वय समिती कार्यरत राहील, असा विश्वासही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला.