आंबेगावच्या पीडित शेतकरी फाले कुटुंबाला संग्राम प्रभूगांवकरांचा आधार; मारहाणकर्त्यांवर कारवाई न झाल्यास कायदा हाती घेण्याचा इशारा

​सावंतवाडी | प्रतिनिधी

आंबोली येथे झालेल्या मारहाण प्रकरणामुळे हवालदिल झालेले आंबेगाव येथील शेतकरी जानू फाले यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पशुधन व कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी प्रभूगांवकर यांनी फाले कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द करत धीर दिला. मात्र, या घटनेतील दोषींवर अद्याप कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, “गुन्हे दाखल न झाल्यास शेतकरी कायदा हाती घेतील,” असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

​नेमकी घटना काय?
​आंबेगाव येथील शेतकरी जानू फाले हे दुसऱ्याची जमीन कसून आपला उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आपल्या जनावरांचा सांभाळ करणे कठीण जात होते. त्यामुळे ते आपले बैल नातेवाईकांकडे सोपवण्यासाठी घेऊन जात असताना आंबोली येथे त्यांना अडवून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या श्री. फाले यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते अंथरूणाला खिळून आहेत.

​शेतकरी संघटना फाले कुटुंबाच्या पाठीशी – संग्राम प्रभूगांवकर
​यावेळी बोलताना संग्राम प्रभूगांवकर म्हणाले की, “एका गरीब शेतकऱ्याला अशा प्रकारे मारहाण होणे ही जिल्ह्यासाठी दुर्दैवी बाब आहे. मारहाण करणारे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत, ही प्रशासनाची हतबलता आहे. फाले कुटुंब अत्यंत कष्टाळू असून त्यांच्यावर ओढवलेला हा प्रसंग निंदनीय आहे. शेतकरी संघटना या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जर संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल झाले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.”
​गावकऱ्यांचा प्रशासनावर रोष

​आंबेगावचे सरपंच शिवाजी परब यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आज जानू फाले यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. ते शेती करून जगणारे कुटुंब आहे, पण या मारहाणीनंतर त्यांची विचारपूस करण्यास कुणीही पुढे आले नाही. आज शेतकरी संघटनेने दखल घेतली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.”

​या भेटीदरम्यान रूपेश पावसकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आंबेगावचे ग्रामस्थ आणि फाले कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट असून, पोलीस प्रशासन आता काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.