ग्रामपंचायत आणि ग्रामसंघाचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी: ग्रामपंचायत खांबाळे आणि ग्रामसंघ यांच्या सयुंक्त विद्यमाने दिवाळी खाद्य महोत्सवाचे आयोजन दि. १७ व १८ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे. गावातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या दिवाळी फराळासह विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
उमेद् अभियानातर्गंत गावात अनेक महिला बचत गट निर्माण झाले आहेत. या महिला बचत गटांकडुन काही उत्पादनांची निर्मिती केली जाते. परंतु त्यांना अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत खांबाळे आणि ग्रामसंघाच्यावतीने मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानातर्गंत दिवाळी खाद्य महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महोत्सव १७ आणि १८ असा दोन दिवस ग्रामपंचायत खांबाळेच्या आवारात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते १७ ऑक्टोंबरला सायकांळी चार वाजता होणार आहे. या महोत्सवात गावातील महिला बचत गटाचे स्टॉल असणार आहेत. दिवाळी फराळा सोबत बचत गटामार्फत बनविण्यात येणारी इतर उत्पादने विक्रीकरीता ठेवण्यात येणार आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार फराळ उपलब्ध करून देण्या येणार आहे. या खाद्य महोत्सवाला गावासह तालुक्यातील सर्व नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन खांबाळे ग्रामपंचायत सरपंच प्राजक्ता कदम,उपसरपंच मंगेश गुरव आणि ग्रामसेवक नयना गुरखे यांनी केले आहे.











