सावर्डे येथील उपक्रमास ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांची उपस्थिती
चिपळूण (प्रतिनिधी)--: तालुक्यातील सावर्डे येथे आयोजित लायन्स क्लबच्या महोत्सवात सावर्डे परिसरातील सुमारे ५० गावांतील नागरिकांनी गर्दी केली होती. दररोज हजारो नागरिक या महोत्सवातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी या उपक्रमाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील, सतीश सावर्डेकर, देवराज गरगटे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ सावर्डेला शुभेच्छा देताना ते म्हणाले, लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी समाजोपयोगी संस्था असून, त्यांची आपल्या कार्यक्रमाद्वारे सेवा करणे हे प्रमुख ध्येय आहे. सावर्डे परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अंधत्व निवारण, मधुमेह, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती निवारण आधी सेवाकार्य निश्चितपणे सावडेंचा लायन्स क्लब करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी प्रांतपाल एमजेएफ ला. वीरेंद्र चिखले, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम, हास्यजत्रा फेम कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे, सावर्डे ग्रामपंचायत सरपंच समीक्षा बागवे, सावर्डे लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. प्रकाश शिर्के, सचिव राजेश कोकाटे, खजिनदार डॉ. अरुण पाटील यांच्याबरोबरच ग्रामीण परिसरातील नागरिक उपस्थित होते.
*साक्षी जड्याळ हिचा सत्कार*
पुणे येथील ४२ किलोमीटर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन या धावण्याच्या शर्यतीत कुडप गावची साक्षी जड्याळ हिने इथिओपियाच्या महिला धावपटूला मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल लायन्स क्लब ऑफ सावडेंच्या वतीने यावेळी तिचा सत्कार करण्यात आला. यावेळ विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.









