चिपळूण न. प. निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सरस

भाजपच्या वाढल्या जागा; उर्वरित उमेदवारांचा थोडक्या मतांनी विजय हुकला
भाजपचे प्रशांत यादव यांचे योग्य नियोजन

*चिपळूण (संतोष सावर्डेकर):–* चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांमधील एकमेकांवरील राजकीय कुरघोडी तर शिवसेना- भाजप युतीचा योग्य समन्वय तर एकाकी पडलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष. या सर्व घडामोडीत शिवसेना भाजप- युती सरस ठरली आहे. यामध्ये भाजप नेते प्रशांत यादव यांनी निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडताना भाजपच्या ११ उमेदवारांपैकी ७ उमेदवार निवडून आणतांना मागील निवडणुकीपेक्षा दोन जागा वाढवण्यात यश मिळवले आहे. शिवसेना-भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार उमेश सकपाळ यांच्या विजयात देखील भाजपने सिंहाचा वाटा उचलला आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बऱ्याच वर्षानंतर मतदारांनी युतीला स्पष्ट कौल दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेश सकपाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार रमेश कदम यांना १,२८१ मतांनी पराभूत केले आहे. शिवसेना-भाजप युतीने नगरसेवकांच्या २८ जागांपैकी तब्बल १६ जागांवर विजय मिळवत चिपळूण नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदासह प्राबल्य सिद्ध केले आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने ९ तर भाजपने ७ तसेच शिवसेना उबाठा ५, काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) पक्षाला प्रत्येकी २-२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

*शिवसेना-भाजप युतीचा योग्य समन्वय तर महाविकास आघाडीत राजकीय कुरघोडी*

चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण खुल्या वर्गासाठी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी मैदानात उतरण्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे महायुती शिवसेना शिंदे गटाकडून उमेश सकपाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून मिलिंद कापडी यांचे नाव पुढे आले. मात्र, जागा वाटपावरून शिवसेना-भाजप युती तर महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष बाजूला राहिला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमेश कदम यांनी आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तर काँग्रेसकडून लियाकत शाह यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यावर हटून बसले. तोपर्यंत शिवसेना उबाठाकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव पुढे आले नव्हते. दरम्यान, महाविकास आघाडी होऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रमेश कदम यांचे नाव कायम राहिले. तर शिवसेना उबाठा नेते आ. भास्कर जाधव यांनी कदम यांना पाठिंबा दर्शवला. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी पक्षाकडून माजी नगरसेवक राजू देवळेकर यांचे नाव निश्चित करताना नगरसेवक पदाचे उमेदवार देखील जाहीर केले आणि इथेच महाविकास आघाडीत बिघाडी झाली. शिवसेना उबाठा पक्षात देखील दुफळी असल्याचे समोर आले. एकंदरीत शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष एकाकी तर महाविकास आघाडी ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत राहिली आणि महायुती आणि महाविकास आघाडी होऊ शकली नाही. आता दोनच दिवसांपूर्वी चिपळूण नगर परिषदेचे निकाल समोर आले असून यामध्ये शिवसेना- भाजप युतीचा समन्वय तर महाविकास आघाडीच्या बिघाडीचा फटका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांना देखील बसला आहे.

*भाजपच्या प्रशांत यादव यांनी निवडणूक संयोजक पदाची बजावली चोख जबाबदारी!*

भाजपने ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. यामध्ये ७ उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधील भाजपच्या उमेदवार ५ मतांनी हरल्या आहेत. तर उर्वरित उमेदवार काही मतांनी पराभूत झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी प्रशांत यादव यांच्यावर सोपवली. ती जबाबदारी सार्थकी ठरवताना मागील निवडणुकीपेक्षा २ जागा वाढवण्यात यश मिळवले आहे. तसेच जिथे- जिथे भाजपचे उमेदवार उभे होते. तिथे – तिथे शिवसेनेच्या सहकार्याने युतीच्या जागा निवडून आणतानाच युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांना मताधिक्य मिळवून देण्यात यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार शशिकांत मोदी व अंजली कदम या दोन्ही उमेदवारांनी विजयी मिळवत सकपाळ यांना मताधिक्य दिलेच. शिवाय अन्य प्रभागात देखील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांनी योग्य समन्वय साधत विजय मिळवित सकपाळ यांना आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. शिवसेनेकडून उपनेते आ. सदानंद चव्हाण यांनी नेतृत्व केले. चव्हाण यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटले. यात ते यशस्वी देखील झाले.

*उमेश सकपाळ व रमेश कदम यांच्यातच झाली लढत*

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे रमेश कदम व शिवसेना शिंदे गटाचे उमेश सकपाळ यांच्यातच लढत झाली असल्याची दिसून येत आहे. मात्र, युतीचे उमेदवार सकपाळ सरस ठरले आहे. उमेश सकपाळ यांनी तब्बल १० प्रभागात आघाडी मिळवत आपल्या विजयाचा मार्ग शिवसेनेसह भाजप उमेदवारांच्या सहकार्याने सुकर केला. मात्र, प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. मात्र, सकपाळ यांना या प्रभागात मताधिक्य मिळू शकले नाही. तर ते उलट २६० मतांनी मागे राहिले. प्रभाग क्रमांक १३ मध्ये तब्बल ६८५ मतांची आघाडी घेत आपल्या या पारंपरिक प्रभागातील वर्चस्व सकपाळ यांनी सिद्ध केले आहे.

*प्रभाग १४ मध्ये उबाठाचे उमेदवार विजयी; परंतु, रमेश कदम मागे पडले!*

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांनी अवघ्या चार प्रभागात मतांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे शिवसेना उबाठा नेते आ. भास्कर जाधव यांनी कदम यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी प्रभाग क्रमांक १४ मधून उबाठाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. यामध्ये जाधव यांच्या मुलीचा देखील समावेश आहे. तरी देखील ते कदम यांना या प्रभागात आघाडी मिळवून देऊ शकले नाही. तर युतीचे नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले असले तरी सकपाळ यांना २१४ मतांची आघाडी मिळाली आहे. तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून या प्रभागात रमेश कदम यांनी तब्बल ६०८ मतांची आघाडी घेतली. मात्र, त्यांचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. एकंदरीत या निवडणुकीत एकूणच सरमिसळ राजकारण घडले असल्याचे बोलले जात आहे. तसेच चिपळूण नगरपरिषद निवडणुकीचा निकाल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिंतन करायला लावणारा आहे. तसेच शिवसेना उबाठाला देखील आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. तर शिवसेना-भाजप युती अशीच संघटित राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष व महाविकास आघाडीला पुढच्या निवडणुका तितक्याशा सोप्या नाहीत, हे देखील तितकेच खरे आहे.