रत्नागिरी : खेड येथील लोटे एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड संदर्भात सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या काही पोस्ट व व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस कंपनीच्या वतीने प्लांट हेड श्री. दीपक पाटील उपस्थित होते .
या बैठकीत सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या चिंता, कायदेशीर बाबी, पर्यावरणीय नियमांचे पालन, तसेच सक्षम प्राधिकरणांनी जारी केलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कंपनी प्रतिनिधींना सर्व लागू कायदे व नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा ती प्रसारित करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले .













