खेड (प्रतिनिधी) – दिनांक २४ डिसेंबर रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेड येथे बालवाटिका विभागातील विद्यार्थ्यांचे ‘बचपन’ हे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. लहानग्यांच्या निरागस कलाविष्कारांनी आणि रंगीबेरंगी सादरीकरणांनी संपूर्ण सभागृह आनंदाने भारावून गेले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. सौ. माधवी बुटाला यांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी रोटरी स्कूलचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सहजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. राजेश बुटाला, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. शशिकांत चव्हाण, खेडमधील प्रसिद्ध उद्योजक श्री. मंदार उसरे, श्री. नरेश इदाते, शिवसेना सचिव श्री. संतोष आग्रे, विभागप्रमुख श्री. पराग कोलवणकर तसेच खेड तालुका कृषी अधिकारी श्री. माळी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या मा. सौ. माधवी बुटाला यांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी भेटवस्तू व श्रीफळ देऊन केले. तसेच चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुस्तकरूपी भेट देऊन सन्मान केला. आपल्या भाषणात मा. सौ. माधवी बुटाला यांनी रोटरी शाळेसोबतचा जुना स्नेह आठवत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. शशिकांत चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा आरसा असल्याचे सांगत मुलांनी सादर केलेल्या कलाप्रकारांमधून त्यांची कल्पकता व मेहनत स्पष्टपणे दिसून येत असल्याचे नमूद केले. अभ्यासाचा ताण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे तसेच शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील शिक्षकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
‘बचपन’ स्नेहसंमेलनात बालवाटिका विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात वेलकम गीताने झाली. त्यानंतर मराठी, हिंदी व इंग्रजी गाण्यांवर आधारित रेट्रो थीम, डिस्को डान्स, कोळी डान्स, बेबी शार्क, सेनोरिटा, मावळे, बॅक टू स्कूल, टुकूर टुकूर, झुबी डुबी अशा रंगतदार नृत्याविष्कारांनी वातावरण चैतन्यमय केले. संगीत शिक्षक श्री. अभिषेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांनी तालासुरात ‘अच्युतम केशवम’ हे भजन सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला.
या सोहळ्यासाठी उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे तसेच सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी या यशस्वी स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.
लहानग्यांच्या निरागस हास्याने आणि रंगीबेरंगी सादरीकरणांनी सजलेला हा ‘बचपन’ स्नेहसंमेलन सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आनंदाची आठवण ठेऊन गेला.












