वेरळ येथे मुंबई-गोवा महामार्गाला तडे; महामार्ग व सर्व्हिस रोड खचल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खेड/रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वेरळ येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारे चित्र समोर आले आहे. उड्डाणपुलालगतचा सर्व्हिस रोड तसेच महामार्गाच्या काही भागाला मोठे तडे गेले असून, अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे दिसून येत आहे.
गोव्याच्या दिशेने जाणारा महामार्ग आणि सर्व्हिस रोड, तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाचाही काही भाग खचल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या तड्यांवर आणि खचलेल्या भागावर ठेकेदाराकडून सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
अवघ्या दीड महिन्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला झालेल्या या महामार्गाची अशी दुरवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.