मांजरी-मुंढवा रस्त्यावर भीषण अपघात
डंपर चालक फरार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
पुण्यातील केशवनगर परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ किरकोळ जखमी झाला. कामावरून घरी परतत असताना भरधाव डंपर ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे.
पुणे : केशवनगर येथील मांजरी-मुंढवा रस्ता परिसरात सोमवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत भूषण अहिरराव (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याचा लहान भाऊ पंकज अहिरराव (वय ३२) हा किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघातानंतर जखमी पंकजने मंगळवारी मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन्ही भाऊ मुंढवा परिसरातील एका खासगी व्यावसायिक आस्थापनेत काम करत होते. काम संपवून घरी परतत असताना डंपर ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मुंढवा पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता वासनिक यांनी प्रहार डिजिटलला सांगितले की, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. डंपरचा चालक आणि मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.
पोलिस तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, डंपर चालकाने इतर रस्ता वापरकर्त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. वेग कमी न करता किंवा ब्रेक न लावता त्याने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरून मृत्यू केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.










