​”कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल! नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर जनसागर लोटला”

रत्नागिरी :
येत्या नाताळची सुटी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाकडे धाव घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. प्रामुख्याने गणपतीपुळे, रत्नागिरी, कर्दे, गुहागर आणि मुरुड यांसारख्या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांनी विशेष पसंती दर्शवली आहे.
​वर्षअखेरीच्या या उत्सवी वातावरणात निळाशार समुद्र आणि कोकणी पाहुणचाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आणि समुद्रकिनारी पर्यटकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून, सर्वच हॉटेल्स आणि होमस्टे ‘फुल’ झाले आहेत. पर्यटकांच्या या वाढत्या गर्दीमुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या मोठा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे.