मुंबई पुण्यात होणारे दर्जेदार कार्यक्रम आपल्या ग्रामीण भागातील लोकांना पाहता यावेत ही सामंत बंधूंची भावना

मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे
आमदार निलेश राणे यांचे गौरवोद्गार

संतोष कोत्रे
लांजा-: मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये होणारे कार्यक्रम हे आपल्या रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांतील लोकांसाठी घेऊन आलात ही साधी गोष्ट नाही.‌ हा कार्यक्रम माझ्या भागातील लोकांला दिसला पाहिजे ही भावना महत्त्वाची असते . ही भावना प्रत्येकाकडे नसते.‌ती दोन्ही सामंत बंधूंकडे आहे.‌ त्यांची ही भावना लक्षात घेतली पाहिजे, त्याबद्दल मी त्यांचे खरोखरच कौतुक व आभार मानतो असे गौरवोद्गार मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी लांजा येथील फोक आख्यान कार्यक्रमा प्रसंगी केले..
द फोक आख्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार निलेश राणे हे लांजा येथे आले होते. यावेळी ते बोलत होते.‌याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत तसेच लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित होते.‌ या कार्यक्रमाप्रसंगी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, लांजा तालुक्यात एवढी विकास कामे केलात, त्यामुळे निश्चितच लांजा तालुक्याचा कायापालट होईल यात शंका नाही. या विधानसभा मतदारसंघात सामंत बंधूंच्या माध्यमातून साडेसातशे कोटींचा निधी खर्च केला आहे. प्रारूप विकास आराखडा ७४५ कोटींचा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले.‌ ते पुढे म्हणाले की सिंधुदुर्गात आमदार म्हणून निलेश राणे जिंकला यामध्ये उदय सामंत यांचा ५० टक्के वाटा आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या ‌कामाबाबत कौतुक करताना निलेश राणे म्हणाले की ,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याची काम ते करीत आहेत. शिंदे साहेबांच्या पाठीशी कसे राहायचे त्यांना काय अपेक्षित आहे हे त्यांना चांगले समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जो पक्ष अपेक्षित आहे तसे काम आपण करत आहात अशा शब्दात निलेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांचे कौतुक केले आज कोकणात पक्षाला जी उभारी मिळाली आहे ,त्याच्यामध्ये उदय सामंत यांचे 50% पेक्षा जास्त श्रेय असल्याचे निलेश राणे म्हणाले.
आमदार किरण सामंत यांच्या कामाचे देखील कौतुक करताना आमदार निलेश राणे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये २४ तास उपलब्ध होणारा आमदार म्हणजे किरण सावंत होय. किरण सामंत हे जास्त बोलत नाहीत, पण त्यांचे कामच जास्त बोलते. न बोलता व कोणताही गाजावाजा न करता ते आपल्या कामातून आपली कृती दाखवून देतात अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. आमदार निलेश राणे पुढे म्हणाले की, एक कॉल प्रॉब्लेम सॉल हे सहज होत नसते. त्यासाठी प्रचंड मेहनत, संघर्ष करावा लागतो. ती ताकद असावी लागते. आणि त्यामुळेच पुढील २५ वर्षे देखील किरण सामंत हेच आमदार म्हणून राहतील असा विश्वास देखील आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण कसे जिंकू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्राला आमदार निलेश राणे यांनी दाखवून दिले आहे अशा शब्दात त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव केला.