जिल्ह्यात खळबळ
सावंतवाडी : प्रतिनिधी
बिटकॉइन आणि क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून गोव्यातील ग्राहकांची तब्बल २ कोटी ९० लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील तिघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यात कंपनीचे सीईओ सुभाष धुरी (वय ४५, रा.बांदा), दिगंबर भट (वय ४०, रा. आरोस) आणि सारिका पिळणकर (वय ४० रा. सावंतवाडी) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, त्यांना पणजी न्यायालयात हजर करण्यात आले असता २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
या प्रकरणी सांतइस्तेव-गोवा येथील वेनॉन डायस यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि. कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्याची पत्नी अश्विनी गुलाबराव करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके या संशयितांनी म्हापसा येथे कार्यालय उघडले होते. तसेच संशयितांनी तक्रारदारासह गोव्यातील सुमारे ५०० जणांना जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी तोरसे – पेडणे येथील जमिनीत, कंपनीच्या निवृत्ती वेतन योजनेत, बायोकॉईन आणि इतर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार संशयितांनी तक्रारदार व इतरांकडून २.९० कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदारांना भूखंड व इतर मोबदला न देता कार्यालय बंद करून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याची दखल घेऊन ईओसीचे पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि. कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्याची पत्नी अश्विनी गुलाबराव करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान ईओसीने सोमवार, २२ रोजी सुभाष धुरी, दिगंबर भट आणि सारिका पिळणकर या तिघांना 25 रोजी चौकशी साठी ताब्यात घेतले. त्यांच्यावर उशिरा गुन्हा दाखल करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.












