दापोली मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार घोषणेकडे सर्वांचे लक्ष

दापोली प्रतिनिधी:- दापोली तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रासाठी मानाचा समजला जाणारा दापोली मराठी पत्रकार परिषदेचा वार्षिक पुरस्कार यंदा कुणाला जाहीर होणार, याकडे दापोलीतील नागरीकांसह पत्रकार बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. समाजातील विविध प्रश्न, प्रशासनावर ठेवलेली कडेकोट नजर, जनतेच्या आवाजाला न्याय देणारी निर्भीड पत्रकारिता यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
स्थानिक पातळीवरील बातम्यांपासून ते सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक मुद्द्यांपर्यंत सातत्याने कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या कामाची दखल घेण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे यंदाच्या पुरस्कारासाठी कोणत्या पत्रकारांची निवड होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून नामांकन व कामगिरीचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात असून लवकरच पुरस्कार विजेत्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पुरस्कार वितरण समारंभ दापोलीतच भव्य स्वरूपात होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होणार असल्याने, या घोषणेकडे दापोलीकरांचे विशेष लक्ष लागले आहे.