चिपळूणमध्ये काविळतळी येथे दुकान फोडून ७६ हजारांचे ॲल्युमिनियम साहित्य लंपास

​​चिपळूण:
येथील काविळतळी परिसरात असलेल्या ‘कोयना ग्लास अँड ॲल्युमिनियम’ या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे ७६ हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे साहित्य चोरून नेले आहे. ही घटना २२ डिसेंबर रोजी रात्री ८:०० ते २३ डिसेंबर रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन दिलीप संकपाळ (वय ३८, रा. कळंबस्ते) यांचे काविळतळी येथे ॲल्युमिनियमचे दुकान व शेड आहे. अज्ञात चोरट्याने शेडच्या मागील बाजूचे उभ्या पत्र्याचे नटबोल्ट काढून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील ६० हजार रुपये किमतीचे १५ फूट लांबीचे ॲल्युमिनियम पट्ट्यांचे तीन बंडल, १० हजार रुपयांचे ॲल्युमिनियमचे लहान-मोठे तुकडे आणि ६ हजार रुपये किमतीच्या खिडकीच्या ७ तयार फ्रेम्स, असा एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
​केवळ चोरीच नव्हे, तर चोरट्यांनी जाताना दुकानातील खिडकीसाठी लागणाऱ्या ६ बाय ८ फूट आकाराच्या ६३ काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. या घटनेची तक्रार २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३९ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.