दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहराच्या नगराध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त झालेल्या सौ. मृणाल अभिजीत शेट्ये यांचा पदग्रहण सोहळा आज सोमवार दि. २९ रोजी सकाळी १०.०० वाजता देवरुख नगरपंचायत येथे उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभणार असून शहराच्या विकासकामांचा नवा टप्पा आजपासून सुरू होणार आहे.
सौ. मृणाल शेट्ये यांच्यासोबतच त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक आणि नगरसेविका देखील याच शुभमुहूर्तावर आपल्या कामकाजाचा श्रीगणेशा करणार आहेत. या पदग्रहण सोहळ्याला राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये श्री. रवींद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र राज्य) श्री. नारायण राणे (खासदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग) श्री. उदय सामंत (उद्योगमंत्री व पालकमंत्री, रत्नागिरी) श्री. शेखर निकम (आमदार, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा) श्री. किरण (भैय्या) सामंत (आमदार, राजापूर- लांजा- साखरपा) यांच्यासह श्री. निरंजन डावखरे, श्री. सुभाष बने, श्री. दीपक पटवर्धन, सौ. पुजा निकम, सौ. वर्षा ढेकणे आणि जिल्ह्यातील इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी बोलताना निमंत्रक आणि नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी भावना व्यक्त केल्या की, “शहरातील नागरिकांच्या आशीर्वादाने मला पुन्हा ही जबाबदारी मिळाली आहे. देवरुखच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या पदग्रहण सोहळ्याला सर्व नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












