जि. प. शाळांच्या दापोली तालुकास्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धेची उत्साहात सांगता.

दापोली प्रतिनिधी:-
दापोली तालुक्यातील खेडोपाडी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी क्रीडास्पर्धा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात सांगता समारंभात गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. “यश आणि अपयश दोन्ही पचवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजे. यश मिळाल्याने हुरळून जाऊ नये आणि पराभवामुळे खचून जाऊ नये; तर पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करावेत. खेळामुळे मन, मेंदू आणि मनगट सक्षम होत असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.”

विस्ताराधिकारी बळीराम राठोड, मेघा पवार, सुधाकर गायकवाड, नजीर वलेले यांच्यासह केंद्रप्रमुख धनंजय सिरसाट, सुनील कारखेले, संजय जंगम, गुलाबराव गावीत, दिपाली जुवेकर, दिलीप जाधव तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दापोली तालुक्यातील गावतळे, उंबर्ले, दापोली, करंजाणी, पालगड व आंजर्ले या सहा प्रभागांतून आलेल्या निवडक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धांद्वारे सांघिक व वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
दापोली तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना सदाशिव रसाळ व अंकुश गोफणे यांच्या सौजन्याने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय फंड व स्वागत समितीच्या सदस्यांनी केले. बक्षीस वितरणाने या क्रीडासोहळ्याची सांगता झाली.