खेड (प्रतिनिधी) — खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश संपादन करत 21–0 अशा फरकाने सत्तांतर घडवून आणले होते. जनतेतून थेट झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सौ. माधवी राजेश बुटाला यांनी घवघवीत विजय मिळवला होता. आज सोमवार 29 डिसेंबर रोजी त्यांनी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.
या पदग्रहण सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी सौ. श्रेया ताई कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, जिल्हा परिषद माजी सभापती अण्णा कदम, भाजप नेते व माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह खेड शहरातील नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी खेड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. माधवी बुटाला यांना जल्लोषात नगरपरिषद कार्यालयात आणण्यात आले. नगरपरिषद आवारात त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष सौ. माधवी बुटाला म्हणाल्या की, आज मिळालेला हा विजय माझा नसून संपूर्ण खेडवासियांचा आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि कदम परिवारासह सर्व खेडवासियांनी मिळून हा विजय घडवून आणला आहे. या विश्वासाला पात्र ठरत खेड शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल. खेड शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्याचा माझा संकल्प आहे. महायुतीच्या या ऐतिहासिक 21–0 विजयामुळे खेडच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.











