शिवसेना पदाधिकाऱ्यांचे पोलीस व तहसील प्रशासनास निवेदन
‘शिवसेना स्टाईल’ ने उत्तर देण्याचा इशारा
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील सागरी महामार्ग येथे तिघा जणांनी मधधुंद अवस्थेत धिंगाणा घालून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांकडे खंडणी मागून त्यांना त्रास देण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. पैसे न मिळाल्याने पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना बोलावून डंपरवर कारवाई करण्यास भाग पाडले गेले. कायदा हातात घेऊन गाड्या अडवून खंडणी मागणाऱ्या त्या तिघांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा मालवण शिवसेनेच्या वतीने लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन दिला आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक दिपक पाटकर, महिला आघाडी शहर प्रमुख नगरसेविका पुनम चव्हाण, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, मेघा गावकर, अश्विनी कांदळकर, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गावकर, विश्वास गावकर, मोहन वराडकर, किसन मांजरेकर, बाबा लुडबे, नरेश हुले, हरीष गावकर, भाई मांजरेकर, राजु बिडये, भाऊ मोर्जे, निकीत वराडकर, शेखर गाड, शाम वाक्कर, यशवंत गावकर, सागर भोगावकर, सुशील शेडगे, आशिष शेडगे, संजय वराडकर, बाबा मोरजकर, अनिल कांदळकर, वसंत गावकर, अभिलेख शिंदे, मंदार कांदळकर, नितेश पराडकर, कौशल गवंडी, जाबीर खान, बाबा आंगणे, बाळू नाटेकर तसेच इतर पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात सागरी महामार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या गोवा पासिंग डंपर चालकांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणातील संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. २६ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता धुरीवाडा येथील तिघांनी दारू पिऊन धिंगाणा घालत सागरी महामार्गावरून जाणाऱ्या गोवा पासिंग वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांना अडवून त्यांच्याकडून खंडणीची मागितली. चालकांकडे मागितलेली रक्कम नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधितांनी महसूल व पोलीस प्रशासनाला घटनास्थळी बोलावून अनधिकृत वाळू वाहतूक होत असल्याचा आरोप करत सहा डंपर महसूल विभागाकडे जमा करून घेतले. यातील एक युवक हा जामिनावर मुक्त असून त्याच्यावर यापूर्वी जबरी स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून कायदा हातात घेऊन गाड्या अडवणे, चालकांना धमकावणे, मारहाण करणे व सार्वजनिक शांतता भंग करण्याचे प्रकार लोकशाहीस घातक असल्याचे शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. वाळू वाहतूक रोखणे हे महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त कर्तव्य असताना खासगी व्यक्तींनी अशा प्रकारे हस्तक्षेप करणे व दहशत निर्माण करणे चुकीचे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मालवण शहर शांततामय असून अशा प्रकारांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान शिवसेनेच्या वतीने तीघांवरही खंडणी मागणे, धमकी देणे व शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
कोणत्याही रस्त्यावर अपघात झाल्यास त्याला तात्काळ मदतीसाठी धावणारा वाळू व्यावसायिकच असतो. तो अधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी सक्षम आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणांमुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाळू व्यावसायिक हा कर्ज उभारून आपला व्यवसाय करत असतो. त्यालाही कुटुंब आहे. रात्रीच्यावेळी गाड्या थांबवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्याचे धाडस करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणांना चौकशी करण्याचे आणि गाडी थांबविण्याचे अधिकार आहेत. पण एखादी व्यक्ती राजकीय द्वेषातून गाड्या थांबवित असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. नेहमीच सहकार्याच्या भूमीकेत असलेल्या वाळू व्यावसायिकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा देवली सरपंच तथा वाळू व्यावसायिक शाम वाक्कर यांनी दिला.
दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तींना गाड्या थांबविण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न नगरसेवक दिपक पाटकर यांनी उपस्थित करत संबंधित व्यक्तींवर तात्काळ खंडणी मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेनेकडून जाब विचारण्यात येईल. महसूल प्रशासनाने आपल्या अखत्यारीत असणाऱ्या विषयावर त्यांनीच कारवाई केली पाहिजे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या व्यक्तींना गाड्या अडविण्याचा अधिकार महसूल विभागाने दिला आहे का? असाही प्रश्न श्री. पाटकर यांनी उपस्थित केला आहे.











