३३ रक्तदात्यांचा सहभाग : माहेरवाशिणींनीही जपली सामाजिक बांधिलकी
कलंबिस्त (प्रतिनिधी):
येथील ग्रामस्थांच्या इतिहासात काल, रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. निमित्त होते गावाचा जत्रौत्सव, पूर्ण प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा आणि याच औचित्यावर आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबीर. या तिन्ही उपक्रमांमुळे गावात भक्ती आणि शक्तीसोबतच ‘सामाजिक कृतज्ञतेचा’ एक वेगळाच त्रिवेणी संगम पाहायला मिळाला.
३३ जणांचे रक्तदान; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ आणि ओवळीये ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात एकूण ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात विशेष बाब म्हणजे ५ महिलांनी रक्तदान करून एक नवा आदर्श निर्माण केला. जत्रोत्सवासाठी माहेरी आलेल्या दोन लेकींनी आणि एका माहेरवाशिणीसह तिच्या पतींनीही या रक्तदान यज्ञात आपली समिधा अर्पण केली.
रक्तदान हेच जीवनदान : दयानंद गवस
शिबिराचे उद्घाटन ‘ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे’ अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक दयानंद गवस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “जिल्ह्यात रक्ताची गरज भासल्यास आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस धावून रुग्णांना जीवनदान देतात. ओवळीये ग्रामस्थांनी सुरू केलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून, भविष्यात गावातून असेच तरुण रक्तदाते निर्माण होणे गरजेचे आहे. संस्थेमार्फत रक्तदात्यांना विमा संरक्षणही दिले जात आहे.”
आरोग्याची घ्या काळजी : मोहन गवस
गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मोहन गवस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “रक्तदान करण्यासाठी शरीर सुदृढ असणे आवश्यक आहे. युवकांनी आपल्या आहाराकडे आणि व्यायामाकडे लक्ष देऊन नियमित रक्तदानासाठी सज्ज राहिले पाहिजे, तरच अशा शिबिरांचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.”
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर सचिव बाबली गवंडे, उपसरपंच मनस्वी सावंत, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ, बांदेकर गुरुजी, राऊत गुरुजी, महेश रेमुळकर (कार्याध्यक्ष), सिद्धार्थ पराडकर (खजिनदार) आणि सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. अभिषेक कांबळे, अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी उपस्थित होते.
आयोजनासाठी विशेष मेहनत
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सुमंत धुरी व मुकुंद धुरी यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच नितेश सावंत, सुहास सावंत, सचिन गवस, भाग्यदीप सावंत, सखाराम सावंत, साईनाथ राऊळ, सागर सावंत, विश्वनाथ सावंत, राहुल सावंत, नरेंद्र धुरी, पंकज सावंत यांनी अथक परिश्रम घेतले.













