सलग ५३ तास स्केटिंग करण्याच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दुसऱ्यांदा नोंद
राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील उपळे या गावातील मुळ रहिवासी असलेल्या आणि मुंबईत मीरा रोड येथे स्थायिक असलेल्या रूद्र संजय कदम याने बेळगाव कर्नाटक येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत सहभागी होऊन सलग ५३ तास स्केटिंग करण्याचा विक्रम करून “गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये आपल्या नावाची नोंद करून एक विश्वविक्रम केला आहे. गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडून त्याबाबतचे तसे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
दिनांक २३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान बेळगांव येथे झालेल्या गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासाठी सलग ५३ तास स्केटिंग करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे आयोजन “शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब”, बेळगाव यांच्यामार्फत करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील बऱ्याच स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
मिरारोड मधून एकुण ३३ मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रशिक्षक संतोष मिश्रा यांच्या हाताखाली रूद्र हा गेल्या दोन वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे. परंतु अवघ्या दोन वर्षाच्या प्रशिक्षणाच्या जोरावर रूद्र याने इतकी उंच भरारी घेतली आहे.
त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई मीरा रोड जीसीसी क्लब येथे झालेल्या एका स्पर्धेत सहभागी होऊन एक तास एकोणीस मिनिटं न थांबता स्केटिंग करून रूद्र याने जिनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, “यूएन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”, आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा तीन रेकॉर्ड बूक मध्ये आपल्या नावाची यशस्वी नोंद केली आहे.
आमच्या कुटुंबाला व संपूर्ण गावाला रूद्र याने केलेल्या कामगिरीचा अभिमान वाटतो, आमच्या घरातील लहान पिढीने आकाशाला गवसणी घातल्याचं आम्हाला कौतुक आहे, अशा शब्दांत रूद्र चे आजोबा राजापूरचे उबाठाचे तालुका प्रमुख कमलाकर कदम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रूद्र हा इयत्ता पाचवीत शिकत असून शालेय अभ्यासक्रमात सुद्धा तो हुशार व एक गुणी विद्यार्थी आहे. त्याचप्रमाणे तो इतरही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतो. अशा या अकरा वर्षांच्या हरहुन्नरी रूद्र ने सगळ्यांनाच अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. स्केटिंग या क्रिडाप्रकाराबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी रूद्र याची कामगिरी नक्कीच महत्वाची ठरेल. त्याची जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत यामुळे आज त्याला हे यश मिळालेलं आहे त्याबद्दल त्याचं खूप कौतुक आणि अभिनंदन होत आहे.













