अणसूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘दिव्यांग मेळावा’ उत्साहात संपन्न…
वेंगुर्ले : दाजी नाईक
“दिव्यांग हा समाजाचा अविभाज्य घटक असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत सदैव कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन यावेळी अणसूर सरपंच श्री. सत्यविजय गावडे यांनी केले.
दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियांनातर्गत ग्रामपंचायत अणसूर, सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतीने अणसूर पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
हा मेळावा अणसूर पूर्ण प्राथमिक शाळा वरचे येथे घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये अणसूर गावचे गावचे सरपंच श्री. सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे,वामन गावडे, शाळेचे मुख्याध्यापक मळगावकर सर, पाल सरपंच कावेरी गावडे तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी विशाखा कासले, प्रणाली दळवी,ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने दीपप्रज्वलन करून लुई ब्रेल व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच संस्था अध्यक्ष श्री.अनिल शिंगाडे यांचा अणसूर ग्रामपंचायतीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अणसूर पंचक्रोशीतील ५० हून जास्त दिव्यांग बांधव आणि त्यांचे पालक उपस्थित होते. दिव्यांग मेळाव्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. नवीन दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी मार्गदर्शन, पेन्शन योजना आणि साहाय्यभूत साधनांच्या मागणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली.
ग्रामपंचायत अणसूर घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले.












