दोडामार्ग:
जंगलातून भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत आलेल्या एका महाकाय जंगली गवारेड्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. दोडामार्ग तालुक्यातील माटणे-वरचीवाडी परिसरात ही घटना घडली असून, विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
माटणे येथील शेतकरी सखाराम हरिश्चंद्र गवस हे सोमवारी सायंकाळी आपल्या काजू बागेत साफसफाईच्या कामासाठी गेले होते. बागेतील विहिरीच्या दिशेने गेले असता, त्यांना विहिरीत एक मोठा प्राणी पडलेला दिसला. जवळ जाऊन पाहिल्यावर तो एक पूर्ण वाढ झालेला गवारेडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुर्देवाने, तोपर्यंत गवारेड्याचा मृत्यू झाला होता.
वन विभागाकडून पाहणी
सखाराम गवस यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर वन विभागाच्या दोडामार्ग कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले होते यामध्ये
गवारेडा साधारण ३ ते ४ दिवसांपूर्वी विहिरीत पडला असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती.
बचावकार्यात अडथळे: विहिरीत पाणी असल्याने आणि गवारेड्याचे वजन प्रचंड असल्याने मृतदेह बाहेर काढताना वन कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
वन विभागाच्या या मोहिमेत माटणे-वरचीवाडी येथील ग्रामस्थांनी आणि पोलीस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
या घटनेमुळे शेतातील विहिरींना संरक्षक कठडे असण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींना कठडा नसल्यास वन्यप्राण्यांसोबतच पाळीव जनावरांच्या जीवालाही धोका निर्माण होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.












