एसटीतून अवैध गुटख्याची वाहतूक; देवगडमध्ये संशयितास अटक
देवगड / प्रतिनिधी
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना व अवैध गुटख्याची एसटीमधून वाहतूक करणाऱ्या दाभोळे–धुरीवाडी येथील संदेश चंद्रकांत धुरी (वय ४१) याला देवगड पोलिसांनी शिरगाव चेकपोस्ट येथे ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, २९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांना संशयित संदेश धुरी हा अवैध गुटखा एसटीमधून वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे देवगड–नांदगाव महामार्गावरून देवगडच्या दिशेने येणाऱ्या एसटीवर पोलिसांनी पाळत ठेवली. शिरगाव चेकपोस्ट येथे एसटी थांबवून संशयिताची तपासणी केली असता त्याच्याजवळील गोणीमध्ये सुमारे ६८ हजार ४०० रुपयांचा अवैध गुटखा आढळून आला.
यामध्ये ४३ हजार ५६० रुपयांचा विमल पानमसाला, १८ हजार ८०० रुपयांचा केशरयुक्त विमल पानमसाला, ४ हजार ८४० रुपये व १ हजार २०० रुपयांचा व्हीआय तंबाखू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपेश दीपक तांबे यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच अन्नसुरक्षा व मानकी अधिनियम २००६ अंतर्गत कलम २६ (२)(IV), २७ (३)(डी), २७ (३)(ई), ३० (२)(ए) व ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताला अटक करून मंगळवारी देवगड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.












