देवगड समुद्रकिनाऱ्यावर ‘जल्लोष २०२६’चे उत्साहात उद्घाटन

देवगड म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि पर्यटनाची ओळख – तहसीलदार आर. जे. पवार

पर्यटन विकासातून रोजगार व समृद्धीचा मार्ग मोकळा


देवगड म्हणजे केवळ प्रशासकीय तालुका नसून निसर्गाची अमूल्य देणगी, हापूस आंब्याचा दरवळ, मनोहारी समुद्रकिनारे आणि कष्टाळू माणसांची ओळख आहे, असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव ‘जल्लोष २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या उद्घाटन सोहळ्याला भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफ  मेमन, देवगड व्यापारी संस्थेचे अध्यक्ष शैलेश कदम, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, एकनाथ तेली, प्रवीण पोकळे, देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी गौरी पाटील, नगरपंचायतीच्या सभापती तन्वी चांदोस्कर, शामराव पाटील, दयानंद पाटील, प्रवीण सावंत यांच्यासह अनेक मान्यवर, व्यापारी बांधव, युवक, माता-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार पवार पुढे म्हणाले की, ‘जल्लोष’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून देवगडच्या ओळखीचा उत्सव आहे. पर्यटन म्हणजे केवळ पाहणे नव्हे तर अनुभव घेणे असून देवगडसारखा अनुभव देणारा तालुका महाराष्ट्रात दुर्मिळ आहे. समुद्रकिनारे, मंदिरे, किल्ले, निसर्गसंपदा, मासेमारी, हापूस आंबा आणि स्थानिक खाद्यसंस्कृती या सर्व घटकांसह ‘जल्लोष’सारखा उत्सव देवगडचा स्वतंत्र पर्यटन ब्रँड उभा करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटन विकासामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतात, कलाकारांना व्यासपीठ मिळते, व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल वाढते तसेच शेतकरी व मच्छीमारांनाही थेट फायदा होतो. लोकसहभागातून होणारा विकासच दीर्घकालीन व शाश्वत ठरतो, असे सांगत प्रशासन पर्यटनपूरक उपक्रमांना नेहमीच सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच शिस्त, स्वच्छता, सुरक्षितता व पर्यावरण संवर्धन जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नवीन वर्ष देवगडसाठी अधिक पर्यटन, अधिक रोजगार आणि अधिक समृद्धी घेऊन येवो तसेच ‘जल्लोष’ महोत्सवाची परंपरा दरवर्षी अधिक भव्य होत राहो, अशा शुभेच्छांसह तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते ‘जल्लोष २०२६’चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसाद पारकर, संदीप साटम व गौरी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन दयाळ गावकर यांनी केले.