चिपळूण (प्रतिनिधी) :
2004 पासून जे शिवसैनिक आपल्यासोबत होते. ज्यांनी मला आमदार बनवले त्या सर्व पक्षातील शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या उमेदीने एकत्र या. मी आपले नेतृत्व करायला तयार आहे. आता माघार नाही. माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी जीवाचे रान करीन, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. चिपळूण पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा डोलाने फडकविण्यासाठी सिद्ध होऊया असे अशी भावनिक साद शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या सर्व जुन्या नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना घातली.
आमचे स्वप्न पूर्ण
चिपळूण नगरपरिषदेवर शिवसेना – भाजप युतीचा भगवा फडकविण्याचे आमचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. नगराध्यक्षासह आमची निर्विवाद सत्ता आली याचा आनंद आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्याने हे यश मिळाले याचे समाधान आहे.
2004 पासून सोबत असणाऱ्यांनी एकत्र यावे
2004 मध्ये शिवसेना फुटली आणि या तालुक्यात शिवसेना शिल्लक रहाते की नाही अशी स्थिती होती. आम्ही जुन्या जाणत्या निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र करून 2007 ची जिल्हा परिषद, पंचायत समिती जिगरीने लढलो. कार्यकर्त्यांना यश -अपयश आलो. तरी आम्ही मागे हटलो नाही नव्या उमेदीने काम करीत कार्यकर्त्यांनी मला 2009 मध्ये आमदार केले. आता पुन्हा एकदा शिवसेनेत फूट पडली व कार्यकर्ते विभागले गेले. पुन्हा एकदा मागच्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण पुन्हा नव्या जोमाने एकत्र काम करून कार्यकर्त्यांना बळ देऊ त्यासाठी मी ‘वाली’ व्हायला तयार आहे.
मी नेतृत्व करेन….वैभव पुन्हा उभे करूया
आज पूर्वी प्रमाणे आमचा आमदार नाही. विकास कामे पाहिजे तशी करता येत नाहीत. कार्यकर्त्यांचे सर्व प्रश्न सोडविता येत नाहीत. म्हणून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी सर्वानी एकत्र या, आपण सर्वांचे स्वागत करूया व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवूया यासाठी मी योगदान द्यायला,नेतृत्व करायला तयार आहे. सर्वानी एकत्र येऊन हे वैभव पुन्हा उभे करूया. पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी सर्वानी या प्रवाहात सामील व्हा, मी सर्वतोपरी आपणास मदत करायला तयार आहे असेही मा. आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
शिवसेना प्रबळ असताना….
चिपळूण तालुक्यात शिवसेना प्रबळ असताना विधानसभेला येथील जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला कशी सोडली? की कोणत्या प्रकारे सोडली हेच कळले नाही. पण आता आपण मागे हटायचे नाही सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन आपल्या कार्यकर्त्यांना बळ देऊया, मी कधी फळाची अपेक्षा केली नाही तर पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे असे चव्हाण यांनी सांगितले.
जि. प., पं. स. त युती करणार
नगर परिषदेत शिवसेना म्हणून आम्ही एकत्र लढलो असतो तर किमान 25 जागा शिवसेनेने जिंकल्या असत्या. राष्ट्रवादी सोबत असती तर आणखी यश मिळाले असते. आता निवडणूक संपली निवडून आलेल्या काही नगरसेवकांचे मी अभिनंदन केले. त्यात यापूर्वी माझ्यासाठी काम केलेले माझे सहकारी आहेत. त्यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. उर्वरित नगरसेवकांचे लवकरच अभिनंदन करणार आहे. आपला कोणावर आकस नाही की भेदभाव नाही.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आम्ही भाजप बरोबर युती करणार आहोत. आमच्या बैठका सुरु आहेत. लवकरच चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत सर्वानी एकत्र येऊया व गत वैभव प्राप्त करूया असे आवाहन चव्हाण यांनी केले.
कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही
राष्ट्रवादी अजितदादा गटाला युतीत घेणार नाही का असे छेडता चव्हाण म्हणाले काहीनी स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. नगरपरिषद निवडणुकीत ते आमच्या बरोबर नव्हते. तो आक्षेप माझ्यावर आहे पण मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी आग्रही होतो. ते काहींना पटले नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. आताही ते वेगळे लढणार आहेत. ग्रामीण भागात त्यांची ताकद असेल, ते स्वबळावर निवडून येतील असे त्यांना वाटत असेल असे चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीला दरवाजे बंद असे पालकमंत्री म्हणाल्याची आठवण करून देता ते म्हणाले ते तुम्ही त्यांनाच विचारा असे सांगून आमच्या युतीला या निवडणुकीत फायदा होईल असेही चव्हाण यांनी सांगितले.
मान्यवर उपस्थित…
या पत्रकार परिषदेला शिवसेना उप जिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, तालुका प्रमुख बापू आयरे, तालुका प्रमुख रुपेश घाग,सचिव दिलीप चव्हाण, अनंत पवार, सदानंद पवार, दीपक वरोसे आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.











