सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव
स्वप्निल कदम:- कुडाळ
वरिष्ठ लिपिक सुनील नाईक नाईक यांनी आपल्या सेवा कालावधीत संस्थेच्या हितासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.संस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी सुनील नाईक यांनी खूप मोठे योगदान आहे. नाईक यांनी प्रामाणिक पणे काम केले. विद्यार्थ्यांमध्ये एकोपा निर्माण करण्यात देखील ते नेहमी पुढे असतात. संस्थेची प्रगती व्हावी तसेच विद्यार्थी संख्या वाढून प्रशालेचा नावलौकिक वाढावा यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत. आपल्या कामकाजात केव्हाच त्यांनी तडजोड केली नाही. कामकाजा सोबतच सहकार व सामाजिक कार्यात देखील ते नेहमी पुढे असतात. संस्थेच्या जडणघडणीत श्री नाईक यांचा मोठा वाटा आहे. असे प्रतिपादन तुळसुली ऐक्यवर्धक संघ संस्था सचिव सी. टी. वारंग यांनी तुळसुली महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुनील नाईक यांच्या सेवानिवृत्ती पर कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी सुनील नाईक यांचा संस्था व प्रशालेच्यावतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी तुळसुली सरपंच मिलिंद नाईक, स्कूल कमिटी अध्यक्ष के के वारंग, सौ स्नेहल नाईक, संस्था सल्लागार मकरंद नाईक, सहसचिव ए.पी. वारंग, स्थानिक कमिटी सल्लागार श्री माईनकर, शिक्षक भारती संघटना जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, माजी मुख्याध्यापक श्री चव्हाण सर, श्री जगताप सर, श्री खानोलकर सर, रामचंद्र आजगावकर, सिताराम सावंत, पालटदार श्री वारंग तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील भाटीवडेकर, श्रेया नाईक, प्रथमेश नाईक, साक्षी नाईक, आदी उपस्थित होते. मराठा महासंघ शिक्षकेतर कर्मचारी राज्य संघटना 1983 चे माजी विद्यार्थी बॅच चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री नाईक यांच्या 39 वर्ष सेवेबाबत अनुभव व मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय वेतुरेकर म्हणाले, सुनील नाईक सर यांनी प्रशालेत उत्तम काम केलेच आहे. तसेच त्यांनी सहकारात देखील भरीव योगदान दिले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री नाईक यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. सेवानिवृत्ती पर सत्कार कार्यक्रमात बोलताना श्री सुनील नाईक म्हणाले माझे बालपण याच गावात गेले. माझे शिक्षण देखील याच प्रशालेत झाले आणि मला संस्थेची सेवा करण्याची संधी देखील याच संस्थेने दिली. त्यामुळे माझे संपूर्ण जीवन प्रशालेच्या व संस्थेच्या हितासाठी घालवण्याचे मला समाधान आहे. माझ्या यशात माझ्या कुटुंबासहित संस्थेच्या सुरुवातीपासूनच्या संस्था अध्यक्ष तसेच आजपर्यंत लाभलेले सर्व मुख्याध्यापकांनी मला वेळोवेळी सहकार्य केले. संस्थेमधील सर्व संस्था पदाधिकारी व शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले. आजी माजी विद्यार्थ्यांनी खूप प्रेम व जिव्हाळा दिला. संस्थेच्या आठवणी नेहमीच स्मरणात राहतील मी सर्वांचे आभार व्यक्त करतो असे भावनिक मनोगत श्री नाईक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास गावडे यांनी केले तर आभार अमरनाथ राठोड यांनी मानले.











