दोडामार्गात पाच हत्तींचा धुडगूस; घोटगेवाडीत बागायती उद्ध्वस्त!!

​दोडामार्ग: सुहास देसाई

दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी परिसरात हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा भीषण धुडगूस घातला असून, येथील शेतकऱ्यांच्या कष्टाची बागायत अक्षरशः मातीमोल केली आहे. गणेश टस्करासह पाच हत्तींच्या या कळपाने मंगळवारी रात्री सुमारे पाच तास धुमाकूळ घालत नारळ, सुपारी आणि केळीच्या बागांचे अतोनात नुकसान केले. या संकटामुळे स्थानिक शेतकरी विठ्ठल शंभू गोवेकर आणि नारायण महाबळेश्वर भणगे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

शेती बागायतीत ​पाच तास तांडव करत शेतकरी सक्षम डोळ्यादेखत बागायत जमीनदोस्त केली मागील काही दिवसांपासून हा हत्तींचा कळप घोटगेवाडी परिसरात वावरत आहे. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पाच हत्तींनी विठ्ठल गोवेकर यांच्या बागेत शिरकाव केला. रात्री १ वाजेपर्यंत, म्हणजे सलग पाच तास हत्तींनी बागेत धुमाकूळ घातला. गोवेकर यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या मेहनतीने वाढवलेली नारळ, सुपारी आणि केळीची झाडे हत्तींनी मोडून काढली. हीच परिस्थिती शेजारील शेतकरी नारायण भणगे यांच्या बागेतही पाहायला मिळाली. त्यांच्याही बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.

​पुन्हा एकदा होत्याचे नव्हते झाले!!!

​विशेषतः विठ्ठल गोवेकर यांच्यावर निसर्गाचा हा दुसरा मोठा आघात आहे. २०१९ मध्ये तिलारी नदीला आलेल्या महापुरात त्यांची संपूर्ण बाग वाहून गेली होती. त्या महाभयंकर संकटातून सावरत त्यांनी पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभे केले होते. मात्र, आता हत्तींच्या हल्ल्याने त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने गोवेकर यांना अश्रू अनावर झाले होते.

​शेतकऱ्यांचा वनविभागाला संतप्त सवाल

​”मी आता पुन्हा बागायती उभी करू शकत नाही, आता मी काय करू?” असा आर्त सवाल विठ्ठल गोवेकर यांनी वनविभागाला केली आहे. “आमचे नुकसान होऊच देऊ नका, अशी व्यवस्था करा,” अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

​वारंवार होणाऱ्या या हत्तींच्या त्रासामुळे घोटगेवाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. वनविभागाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी आणि हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.