नवीन वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा

नरेंद्र मोहिते राजापूर:
नगर परिषद निवडणूकांची रणधुमाळी संपून निकाल लागून नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवक कामाला लागले आहेत. तब्बल चार वर्षांनी नगर परिषदेतील प्रशासकिय राजवट संपून आता लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार आला आहे. त्यामुळे आता अधिक जोमाने विकास होईल अशी जनतेची अपेक्षा आहे. शहरातील निवडणूकीच्या या रणधुमाळीनंतर आता ग्रामीण भागाला निवडणूकीचे वेध लागले आहेत. नवीन वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जाहिर होणार असल्याने आता ग्रामीण भागात निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. राजापूर तालुक्यात नव्या नावाने अस्तीत्वात आलेले जिल्हा परिषदेचे सहा गट व त्यातील पंचायत समितीचे बारा गणांमध्ये या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात ग्रामीण भागातील राजकिय वातावरण चांगलेच तापणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुर्ण करण्याचे आदेश राज्य शासन व निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून सध्या निवडणूकांचा सपाटा सुरू आहे. राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणूका पुर्ण झाल्यानंतर आता राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणूकांची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम कधीही जाहिर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये जि. प. व पंचायत समितीच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यानंतर सन २०२२ मध्ये या निवडणूका होणे अपेक्षित होते. मात्र आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या निवडणूका पुढे गेल्या व गेली तीन वर्षे जि. प. व पं. स. वरही प्रशासकिय राजवट जारी आहे. आता या निवडणूकांची प्रक्रिया झाल्यानंतर ही प्रशासकिय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार आहे.
राजापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार या गट व गणांची नावे बदलण्यात आली आहे. तर प्रशासनाकडून आरक्षण सोडत, मतदार यादी निश्चिती या प्रक्रियाही पुर्ण झालेल्या आहेत. तर गट व गणांसह तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोडतही काढण्यात आलेली असून राजापूर तालुका पंचायत समितीचे सभापती पद हे महिला राखीव झालेले आहे.
राजापूर तालुक्यात नव्या नावने अस्तीत्वात आलेल्या जिल्हा परिषद गटांमध्ये धोपेश्वर, वडदहसोळ, साखरीनाटे, तळवडे, जुवाठी, कातळी असे सहा जिल्हा परिषद गट असून या सहा जिल्हा परिषद गटांमध्ये बारा पंचायत समिती गण आहेत. यामध्ये धोपेश्वर जि. प. गटात धोपेश्वर व पेंडखळे, वडदहसोळ जि. प. गटामध्ये वडदहसोळ व रायपाटण, साखरीनाटे जि. प. गटात साखरीनाटे व नाटे, तळवडे जि. प. गटात तळवडे व ताम्हाणे, जुवाठी जि. प. गटात जुवाठी व केळवली तर कातळी जि. प. गटात कातळी व अणसुरे या बारा गणांचा समावेश आहे.
यातील धोपेश्‍वर, वडदहसोळ पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. तर, साखरीनाटे, तळवडे पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित झाला आहे. जुवाठी गण आणि गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण आहे.
रायपाटण, पेंडखळे पंचायत समिती गण सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. तर कातळी पंचायत समिती गण सर्वसाधारण व कातळी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे.
या आरक्षित गट व गणांमध्ये यापुर्वी इच्छुक असलेल्या अनेकांच्या आशाआकांक्षावर आरक्षणामुळे पाणी फेरले आहे. तर काहींना सेफ गट व गण झाल्याने उमेदवारीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. तर काही ठिकाणी राजकिय पक्षांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे.
राजापुरात नगर परिषद निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी हे युत्या व आघाडी करून लढले आहेत. त्याची परिणीती निकालांती दिसून आली आहे. आता या निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी होणार की सर्व जण स्वतंत्र लढणार याचीही उत्सुकता आहे. सर्वच राजकिय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे व बंडखोरी टाळण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे एवढे मात्र नक्की.
पंचायत समिती गट निहाय आरक्षण
सर्वसाधारण- वडदहसोळ, रायपाटण, धोपेश्‍वर, पेंडखळे, कातळी
सर्वसाधारण महिला- तळवडे, केळवली, साखरीनाटे, अणसुरे
नामाप्र महिला- ताम्हाणे, नाटे
नामाप्र- जुवाठी
जिल्हा परिषद गट निहाय आरक्षण
सर्वसाधारण- वडदहसोळ, धोपेश्‍वर
सर्वसाधारण महिला- तळवडे, साखरीनाटे, कातळी
नामाप्र- जुवाठी