मसुरे | झुंजार पेडणेकर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सुकळवाड येथील बाजारपेठ अंगणवाडीमध्ये लोकसहभागातून अंगणवाडीचे पीओपी सिलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. ग्रामस्थ प्रविण मोरजकर आणि गौरव पडते यांच्या विशेष सहकार्यातून सदर काम पूर्ण करण्यात आले. याचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना आधुनिक रूप देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे येणे ही काळाची गरज आहे. सुकळवाड येथील दानशूर व्यक्तींच्या मदतीने अंगणवाडीची वास्तू आता अधिक देखणी आणि सुसज्ज झाली आहे. सुकळवाडचे उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल वाळके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल पाताडे, सदस्य प्रकाश पावसकर, प्रसाद मोरजकर, मुख्याध्यापक श्री. नांदोसकर, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, शिक्षक श्री. बाचीपळे, उद्योजक केशव भिसे, पंढरी पाताडे, देणगीदार प्रविण मोरजकर, अंगणवाडी सेविका धनश्री पडते, मदतनीस दीपाली पेडणेकर, ग्रामरोजगार सहाय्यक प्रदीप पाताडे, अक्षय पाताडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी प्रविण मोरजकर, गौरव पडते यांच्या सामाजिक दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला अशा लोकसहभागामुळे अधिक बळकटी मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.












