ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव येथे ‘इंग्लिश डे’ उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) – खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित ज्ञानदीप विद्या संकुल, भडगाव या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे उपक्रम सातत्याने राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, सभाधीटपणा वाढवणे तसेच सांस्कृतिक मूल्ये जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी विषयाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीबद्दल आवड निर्माण व्हावी, संवादकौशल्य वाढावे आणि आत्मविश्वास दृढ व्हावा या हेतूने प्रशालेच्या स्तरावर विविध उपक्रम राबवले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव येथे ‘इंग्लिश डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पर्यवेक्षक संतोष भोसले, विभाग प्रमुख विठ्ठल सकुंडे, मारुती अडाव आणि सुनील यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
इंग्लिश डे निमित्त इयत्ता 6 वी ते 11 वी पर्यंतच्या तब्बल 692 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसाठी Puzzles, Word Ladder, Palindrome, Tongue Twister अशा विविध शैक्षणिक व मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमधून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतील ज्ञानासोबतच आपली विचारशक्ती, शब्दसंपदा आणि उच्चार कौशल्य यांचे प्रभावी प्रदर्शन केले. खेळांच्या दरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि संपूर्ण परिसर आनंदी वातावरणाने भरून गेला होता. Puzzles ची योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅडबरी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पाटील सर, ओकटे सर आणि आव्हाड सर या इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी उत्तम नियोजन करून मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. प्रशालेकडून तसेच संस्थेकडून सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले असून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.