घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे चिपळूणमध्ये “खनिजांच्या विश्वात” शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन

खेड | प्रतिनिधी: 
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खेड (जि. रत्नागिरी) यांच्या वतीने “खनिजांच्या विश्वात (In the World of Minerals)” या संकल्पनेवर आधारित भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवार व रविवार, दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी चिपळूण शहरात आयोजित करण्यात येत असून, विज्ञान आणि निसर्गातील खनिजसंपत्तीबाबत जनजागृती करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची खनिजे तसेच दगडांचे आकर्षक आणि अभ्यासपूर्ण नमुने नागरिकांच्या पाहणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. “दगडात दडलेले विज्ञान समजून घ्या…” या विचारावर आधारित असलेले हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच संशोधक व अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. खनिजांचे प्रकार, त्यांची निर्मिती प्रक्रिया, त्यांचे औद्योगिक व दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच भौगोलिक दृष्टिकोनातून असलेले महत्त्व याविषयी सविस्तर माहिती या प्रदर्शनातून दिली जाणार आहे.
हे शैक्षणिक प्रदर्शन घरडा वाचनालय, पी.एन.जी. शोरूमसमोर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, चिपळूण येथे आयोजित करण्यात आले असून, दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आणि ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खनिज नमुन्यांद्वारे अध्ययनाची संधी मिळणार असल्याने हे प्रदर्शन शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
या प्रदर्शनास नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील तसेच स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. वाय. आर. कुळकर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे.