घरडा इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. एस. पी. टेकाडे यांची एआयसीटीई इंडस्ट्रियल फेलोशिप प्रोग्रामसाठी निवड

खेड | प्रतिनिधी: 
घरडा इंजिनिअरिंग कॉलेज, लवेल येथील रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ. एस. पी. टेकाडे यांची ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांच्या प्रतिष्ठित इंडस्ट्रियल फेलोशिप प्रोग्राममध्ये रिसर्च फेलो म्हणून निवड झाली आहे. ही निवड त्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची पावती मानली जात आहे.
एआयसीटीईच्या या इंडस्ट्रियल फेलोशिप प्रोग्रामअंतर्गत डॉ. टेकाडे हे क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड, कुरकुंभ येथे दिनांक १ जानेवारी २०२६ पासून पुढील एक वर्ष औद्योगिक प्रशिक्षण व संशोधन कार्यासाठी कार्यरत राहणार आहेत. या कालावधीत त्यांना अत्याधुनिक औद्योगिक प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार असून, त्याचा लाभ भविष्यातील अध्यापन व संशोधन कार्यात होणार आहे.
एआयसीटीई इंडस्ट्रियल फेलोशिप प्रोग्रामची रचना शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. सक्रिय प्राध्यापकांचा थेट उद्योग क्षेत्रात सहभाग वाढवून, त्यांना आधुनिक औद्योगिक वातावरणातील ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव प्राप्त करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमामुळे उद्योग-संलग्न शिक्षण देण्याची प्राध्यापकांची क्षमता अधिक बळकट होऊन, विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता आणि उद्योगासाठीची तयारी वाढण्यास मदत होते.
या फेलोशिपसाठी उच्च दर्जाचे संशोधन कार्य, अनुभव आणि शैक्षणिक गुणवत्ता आवश्यक असून, देशभरातून फारच मोजक्या प्राध्यापकांची निवड केली जाते. त्यामुळे डॉ. एस. पी. टेकाडे यांची झालेली निवड ही घरडा इंजिनिअरिंग कॉलेजसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशाबद्दल घरडा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील तसेच रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे यांनी डॉ. टेकाडे यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला असून, त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.